सनबर्न संगीत महोत्सवाच्या विरोधात स्थानिक नागरिक दंड थोपटून उभे राहिले असताना देखील ह्या विरोधाला तीळमात्र न जुमानता धारगळ ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी सदस्यांनी महोत्सवाला आपली मंजुरी देऊन टाकली आहे. महोत्सवाच्या धारगळमधील आयोजनाचे समर्थन करणारे सरपंच आणि पंच यांच्या ह्या महोत्सवप्रेमामागील कारणे जरी गुलदस्त्यात असली, तरी स्थानिकांना रोजगार मिळेल, मोटरसायकल पायलटांना व्यवसाय मिळेल वगैरे जी भंकस कारणे सरपंचमहोदय सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत. सनबर्नला येणारे लोक हे मोटरसायकल पायलट करून येत नसतात. ‘सगळे वरून ठरले आहे’ असे हे महोदय जरी म्हणत असले, तरी जरी वरूरन सगळे ठरलेले असले, तरी स्थानिक ग्रामसभेमध्ये जेव्हा नागरिक एवढ्या बुलंदपणे महोत्सवाच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्या जनमताचा मान राखून पंचायत ह्या महोत्सवाला परवानगी निश्चितच नाकारू शकली असती. परंतु पंचायत मंडळाच्या सत्ताधारी सदस्यांनी हे केले नाही. अर्थात, जनतेचा विरोध असूनही ते जनतेसोबत का राहिले नाहीत हे तेच जाणोत. महोत्सवाला दरवर्षी का विरोध होतो ह्याची कारणमीमांसा आम्ही कालच्या अग्रलेखात केलीच आहे. यावेळीही परिस्थिती काही वेगळी नाही. पंचायतीची आणि सरकारची परवानगीच मिळालेली नसताना आणि महोत्सवाची जागा देखील ठरलेली नसताना आयोजकांनी बुक माय शोवरून तिकीटविक्री सुरू केली होती ह्यावरूनच स्थानिक प्रशासनाला आणि यंत्रणेला महोत्सवाच्या आयोजकांनी कसे गृहित धरलेले आहे हे स्पष्ट दिसते. कोणी कितीही विरोध जरी केला किंवा विरोध करण्याचा आव आणला तरी तो आपण मोडून काढून हा महोत्सव भरवू शकतो ही गुर्मी ह्यामागे आहे. जनतेचा विरोध आहे तो संगीत महोत्सवाला नाहीच आहे. ह्या महोत्सवाच्या निमित्ताने जे जे गैरप्रकार होतात, मग ते ध्वनिप्रदूषण असो, वाहतूक कोंडी असो, पार्किंगचा प्रश्न असो, पर्यावरणाची हानी असो किंवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणारी अमली पदार्थांची उलाढाल आणि वाढणारी गुन्हेगारी असो, ह्या सगळ्या कारणांमुळे ठिकठिकाणची जनता विरोधात उभी राहत असते. विरोध करणाऱ्यांपैकी काहींचा विरोध नंतर अर्थपूर्णरीत्या मावळतो. नेते तडजोडी करतात, पण आम जनता आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असते. दरवर्षी महोत्सवाच्या तोंडावर नानाविध तक्रारी पुढे येतात, न्यायालयापर्यंतही धाव घेतली जाते, तरीही त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मात्र प्रशासकीय यंत्रणा पुढे सरसावताना दिसत नाही, त्यामुळेच जनतेचा विरोध कायम राहतो. महोत्सवाला परवानगी देण्यासाठी पायघड्या पसरणारी नेतेमंडळी त्याचा जनतेला जो त्रास होतो त्याबाबत मात्र अवाक्षर काढत नाही. अशा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ व्यवहार होतात. त्यांचा आयोजकांशी जरी काही संबंध नसला, तरी ह्या महोत्सवाच्या निमित्ताने ही उलाढाल होत असल्याने त्याचे खापर शेवटी आयोजकांवर फुटते. अमली पदार्थाचा डोस जास्त झाल्याने यापूर्वी महोत्सवाला आलेल्या ‘संगीतप्रेमीं’चे मृत्यूही ओढवले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा मोठा सोहळा आयोजित करताना त्याला अनुसरून ज्या गैरगोष्टी जोडल्या गेल्या आहेत, त्या दूर सारण्यासाठी सरकारचा काय प्रयत्न आहे? महोत्सवाचे निमित्त करून अमली पदार्थ व्यवहार होऊ नयेत ह्यासाठी पोलीस यंत्रणेने कोणती तयारी केली आहे? सगळे नियम धाब्यावर बसवून ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणती सज्जता केली आहे? महोत्सवाला परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतीने त्यासाठी जे लाखो लोक येणार आहेत, त्यांच्या वर्दळीमुळे स्थानिक ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही ह्या दृष्टीने कोणते पूर्वनियोजन केले आहे? अशा प्रकारच्या कोणत्याही पूर्वनियोजनाविना सरळ ह्या महोत्सवाला परवानगी देऊन टाकणे हे बेजबाबदारपणाचे आहे. हा विषय उद्या न्यायालयातही जाऊ शकतो. गेल्या वर्षीही तो गेला होता. ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने सरकारला तीव्र फटकार लगावली होती. महोत्सवाची ठेव जप्त करून फौजदारी कारवाई करण्याची गर्जना प्रदूषण नियंत्रण मंडळाने तेव्हा केली होती. तिचे पुढे काय झाले? त्यामुळे येरे माझ्या मागल्या अशी स्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नये ह्यासाठी ह्या अशा महोत्सवांना बदनाम करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या दूर करण्यासाठी आधी प्रयत्न करावे लागतील. जनतेला जेव्हा तक्रारीची जागाच राहणार नाही तेव्हा कोणी विरोध करण्याचा प्रश्नच येणार नाही. नुसत्या परवानग्या दिल्याने प्रशासनाची जबाबदारी मुळीच संपणारी नाही. ह्या प्रकरणात विरोधात दंड थोपटलेले सत्ताधारी आमदार महोत्सव रोखू शकतात की स्वतःच प्रवाहपतीत होतात हेही दिसेलच.