मंकीपॉक्सबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना

0
9

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सतर्क राहण्याचे निर्देश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सोमवारी मंक पॉक्सबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या. आरोग्य मंत्रालयाने राज्ांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून व्हायरल इन्फेक्शनच्या स्क्रीनिंगला वेग द्यावा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मंकीपॉक्समुळे भारतात चिंता वाढताना दिसत आहे. संशयित रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारकडून राज्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने संशयितांची तपासणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सबाबत चिंता व्यक्त केली आहे. या आजाराने शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी करताना सतर्क रहा मात्र काळजी करू नका, असे सांगितले आहे. प्रवासाशी संबंधित विलगीकरण प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार असल्याचे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.
रविवारी आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणाची माहिती दिली. ही व्यक्ती परदेशातून भारतात परतली होती. या रुग्णाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मंकीपॉक्सच्या लक्षणांची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.

मागदर्शक सूचनांनुसार मंकीपॉक्स प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संभाव्य धोका ओेळखण्यासाठी आणि देशांतर्गत परिणाम जाणून घेण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून अनावश्यक चिंता करण्याचे कारण नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

जगभरात 208 मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार, 2022 पासून 116 देशांमध्ये 99,176 मंकीपॉक्स या आजाराची प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी 208 लोकांचा मृत्यू झाला आहे.