भ्रष्टाचाराचा भस्मासुर

0
2198

शरत्चंद्र देशप्रभू

देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्मद्रोणासारखे खाली मान घालून अर्थस्य पुरुषो दासचा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.

भ्रष्टाचार्‍यांनी समाजाची नस ओळखली आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीचा प्रभावीपणे वापर करून उमलती विरोधी भावना दडपून, निपटून टाकण्याची कला त्यांना साधली आहे. मूठभर परिवर्तनवादी भ्रष्टाचाराच्या रेट्यापुढे हतबल झाले आहेत. दुर्दैवाने आज भ्रष्टाचार्‍यांचे अनुकरण करण्याकडे तरुणाई झुकताना दिसत आहे. त्यांना दिसतो फक्त झटपट कमावलेला पैसा आणि चंगळ. हे चित्र देशाला मारक आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर म्हणतात– ‘लोकशाहीच लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त करताना दिसत आहे.’

समाजहित, देशहित हे भाषणाचे मुद्दे आज कुचेष्टेचे ठरले आहेत. भ्रष्टाचाराच्या या चिखलात रुतलेल्या समाजाला, देशाला वर काढणारा एखादा नेता राजकीय, सामाजिक क्षितिजावर उगवताना दिसत नाही. देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे लोण पसरवणारा, देशव्यापी संघटना उभारणारा नेता तयार होतानाही दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या समाजापुरता, क्षेत्रापुरता, राज्यापुरता मर्यादित झाला आहे. वैचारिक अधिष्ठान असलेल्या चळवळींना व्यापक व्यासपीठ लाभत नाही. सात्त्विक संताप क्रांतीत परावर्तित करण्याची ईर्षा, तळमळ, हातोटी, ताकद कुठल्याच सामाजिक, राजकीय चळवळीत दृगोच्चर होताना दिसत नाही. याला विविध कारणे असू शकतील. परंतु मुख्यतः बदलत्या काळातील अंतःप्रवाह आणि मतलबी समाज ही मुख्य कारणे असू शकतील. विविध राजकीय पक्षांतील, संघटनांतील वाढते दबावगट, असमांतर प्रवाह, दुबळे नेतृत्व, निष्ठेचा अभाव, स्वार्थपरायणता, अस्तित्वासाठी केलेली तडजोड यामुळे पक्षातील कार्य मुख्य ध्येयापासून फारकत घेताना दिसत आहे. मुख्य म्हणजे जो दुबळा, शोषीत समाजज्याच्यासाठी आपण आयुष्याचा होम करतोतोच संधी मिळाल्यावर व्यवस्थेचा मंडलीक होतो अन् आपला वैयक्तिक स्वार्थ साधू पाहतो. हीच भावना, जाणीव पक्षांना, संघटनांना आपल्या कार्यशैलीबद्दल पुनर्विचार करायला लावते.

भ्रष्टाचाराची कारणमीमांसा बदलत्या राजकीय, सामाजिक समीकरणामुळे अवघड होत आहे. भ्रष्टाचाराची कारणे मुख्यतः मानसिक तसेच सामाजिक अनुषंगाने शोधणे आवश्यक आहे. परंतु या फिरत्या माशाच्या डोळ्याचा वेध घेणे फक्त अर्जुनालाच शक्य होईल. मानसशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ पण आपापल्या कुवतीनुसार भ्रष्टाचारामागे दडलेल्या उघड व छुप्या कारणांचा वेध घेत आहेत. परंतु निष्कर्ष वादातीत नसतात. केव्हा केव्हा निष्कर्ष येईपर्यंत भ्रष्टाचाराचे स्वरूप व व्याप्ती बदललेली आढळते. भ्रष्टाचाराने संशोधित निष्कर्ष ओलांडून नवी वेस गाठलेली आढळते. व्यक्तीस समोर ठेवून भ्रष्टाचाराचे मूळ शोधले तर ते समूहाशी निगडित असल्याचे दिसते. कारण व्यक्तीचे समाजापासून विच्छेदन करूच शकत नाही. परंतु व्यक्तीमुळे जरी समाज घडला तरी असा घडलेला समाज पुनश्‍च व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतो अन् व्यक्तीची वागणूक त्याच अनुषंगाने होते. ही सरभेसळ जर आपल्याला उमगली तर भ्रष्टाचाराच्या समस्येला आपण थेट भिडू शकतो. व्यक्तीचा भ्रष्टाचार हा असुरक्षित भावनेतून निर्माण होतो. असुरक्षित भावना निर्माण करण्यात सामाजिक व्यवस्थेचा सिंहाचा वाटा असतो. तात्पर्य, इंग्रजीतील म्हणीप्रमाणेडपरज्ञश शरींी ळींी ेुप ींरळश्र. प्रलोभनांमुळे व्यक्ती भ्रष्टाचारास बळी पडते.

व्यक्तीच्या भ्रष्टाचाराची मानसिकता नेमकेपणाने उमगली तर तिची सामाजिक परिणती रोखायला मदत होऊ शकते. असुरक्षिततेच्या भावनेमुळे पैसे देऊन सुरक्षित सरकारी मदत मिळविणे किंवा गैरमार्गाने पैसे मिळवून आपल्या पुढच्या जीवनाची तरतूद करणे असले प्रकार सातत्याने होताना दिसतात. दुसर्‍यांच्या सामाजिक स्तराशी बरोबरी करण्याच्या तीव्र इच्छेने पण सर्वसामान्य मनुष्य भ्रष्टाचारास प्रवृत्त होतो. व्यक्तिमत्त्वातले उच्चनीचतेचे गंड पण माणसाला भ्रष्टाचारास प्रवृत्त करतात. जॉन ऑर्वल या सुप्रसिद्ध लेखकाने आपल्या ऍनिमल फार्मया पुस्तकात एकाच वाक्यात मानवी स्वभावातील वर्चस्वाच्या आदिम भावनेतील मर्म सांगितले आहे. तो लिहितोअश्रश्र रपळारश्री रीश र्शिींरश्र, र्लीीं ीेाश रीश ोीश र्शिींरश्र ींहरप ेींहशीी. रोख होता साम्यवादी समाजव्यवस्थेवर. या व्यवस्थेतसुद्धा काही व्यक्ती आपले राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थान इतरांपेक्षा उंचीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतातवैध तसेच अवैध मार्गांनी. यामुळे पण भ्रष्टाचाराला बळ मिळते. एखादा प्रामाणिक अधिकारी निःस्पृहतेला न मिळालेल्या प्रोत्साहनामुळे भ्रष्टाचारास प्रवृत्त होतो. खात्यातील समूहाने होणार्‍या नियोजनबद्ध साखळीचा एक दुवा म्हणून भ्रष्टाचारात नाइलाजाने गुंतवून घेतो. राजकारण्यांच्या हिट लिस्टवर प्रामाणिक अधिकारी असतात. भ्रष्टाचारी व पिळवणूकप्रधान शासनव्यवस्थेत भ्रष्टाचारी अधिकारी चांगल्या प्रकारे मानसिक संतुलन राखू शकतो व आपला पाणउतारा, अन्यायाविरुद्ध सक्षमरीत्या मुकाबला करताना दिसतो. आर्थिक कुवतही वाढलेली असते. त्यामानाने प्रामाणिक अधिकारी खातेनिहाय अन्याय व छळाच्या दबावाखाली कोलमडून गेल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यातल्या त्यात प्रामाणिक अधिकारी पापभीरू, हळवा असला तर परिस्थिती आणखीनच बिकट. मानसिक कोंडमार्‍यामुळे दैवाला दोष देत असे अधिकारी, कर्मचारी नैराश्यग्रस्त होतात. धूर्त प्रामाणिक अधिकारी तत्त्वाच्या चौकटीत राहूनसुद्धा थोडीफार टक्कर देऊ शकतात. यास्तव सर्वसाधारण अधिकारी, कर्मचारी भ्रष्ट व्यवस्थेचा घटक बनण्याचा मार्ग चोखाळताना दिसतात. निर्दोष, प्रामाणिक कर्मचारी जर अन्यायामुळे, छळामुळे भ्रष्टाचारी बनला तर विकृतीकडे वळतो. व्हॅम्पायरसारखा पैसा खाण्याचा वसा सर्वांना देत राहतो. पर्यायाने व्यवस्था खिळखिळी होते. नोकर्‍यांतील आरक्षणामुळे पण कार्यतत्पर व प्रामाणिक अधिकारी भ्रष्टाचारास जवळ करत असल्याचे दिसून येते. आपण निवडलेले उमेदवारच काही वर्षांनी आरक्षणाच्या धोरणानुसार आपल्या डोक्यावर बसतील ही काळ्या दगडावरची रेघ. आपल्याला बढतीची संधी नसणार, तेव्हा आपली बुद्धी, शक्ती का विनाकारण शासनासाठी, समाजासाठी वापरा? तिचा योग्य तो उपयोग करून सात पिढ्यांना पुरणारी माया जोडावी हाच परिस्थितीनुसार पर्याय. यामुळे शासनव्यवस्था पुरती विस्कळीत होते. अशा नकारात्मक, द्वेषमूलक वृत्तीचा अतिरेक म्हणजे सर्वनाश. रेल्वे अपघात व ही मानसिकता यांची संगती या दृष्टीने तपासणे योग्य ठरेल. जे मला नैसर्गिक न्यायाने मिळावयास हवे ते कायदेशीरपणे नाकारले जाते, मला डावलले जाते ही असाहायतेची भावनाच काहींना भ्रष्टाचारास प्रवृत्त करते. यामुळे कदाचित त्यांचे मानसिक संतुलन सुधारण्यास हातभार लागत असेल. राखीवतेच्या धोरणाची सामाजिक पार्श्‍वभूमी व प्रयोजन याकडे लक्ष देण्याचे भान व गरजच यांना भासत नाही. त्यांना दिसतो तो आपल्यावरचा अन्याय. याच अनुषंगाने राखीवतेच्या धोरणाचा सर्व बाजूंनी, अंगांनी विचार होणे आवश्यक आहे.

दुष्परिणामांचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक कोनातून निरपेक्ष व वस्तुनिष्ठ अभ्यास व्हायची नितांत गरज आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने या धोरणामागचे धोके दृष्टीस आणले होते. परंतु सांगोपांग संशोधनाची आवश्यकता आहे. नाहीतर या धोरणामुळे सामाजिक एकोपा उद्ध्वस्त होऊ शकतो. तसेच प्रशासन पण कमकुवत होऊ शकते व समाजमन दुभंगू शकते. कदाचित हे सारे झालेही असेल, परंतु दबलेल्या आवाजामुळे ते परिणामकारकरीत्या पृष्ठभागावर येत नाही.

सहजप्रवृत्तीमुळे पण भ्रष्टाचाराला चालना मिळते. छोट्यामोठ्या भेटवस्तूंनी खतपाणी मिळालेला भ्रष्टाचार कालांतराने भस्मासुर बनतो. भ्रष्टाचार ही प्रवृत्ती असली तरी सुसंस्कृत, संस्कारक्षम मन त्याला वेसण घालू शकते. परंतु आजची शिक्षणपद्धती स्वकेंद्रित असल्यामुळे विद्यार्थ्यांचा भ्रष्टाचाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच व्यावहारिक बनलेला आहे. भ्रष्टाचाराचे समर्थन जरी यांच्याकडून झाले नाही तरी भ्रष्टाचाराविरुद्धचा तिटकारा पण हवा तेवढा तीव्र नसतो. कॉर्पोरेट कल्चरमध्ये तर रिझल्टस्‌ना महत्त्व असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने भ्रष्टाचाराचा मुद्दा गौण ठरतो. आज बेकायदेशीर कामासाठी सोडाच, परंतु कायदेशीर कामांसाठी पण पैशाची मागणी केली जाते. अशावेळी कंपन्या बेकायदेशीर कामासाठी एक छुपी बेहिशेबी आर्थिक तरतूद करून ठेवताना आढळतात. स्पर्धेतून पण भ्रष्टाचाराची महती वाढते.

विविध कंपन्या आपल्या अंतर्गत स्पर्धेत आपले स्थान कायम राखण्यासाठी किंवा नामांकन वाढवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करताना दिसतात. अशा कार्यात त्यांना भ्रष्टाचारी यंत्रणेची मदत होते. हीच बाब व्यक्तींत दिसून येते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाकडून मिळालेल्या संधीचा भल्याबुर्‍या मार्गांनी आपला आर्थिक स्तर वाढवण्याकडे कल दिसतो. या मनोवृत्तीचे लोक आपण भोगलेल्या परिस्थितीविषयी, एकूण व्यवस्थेविरुद्धची चीड भ्रष्टाचाराच्या रूपातून प्रकट करतात. महत्त्वाकांक्षी, बुद्धिमान, परंतु कोडगे लोक भ्रष्टाचार हे आपले साध्य गाठण्याचे साधन म्हणून उपयोग करताना आढळतात. जीवनात काहीतरी भव्यदिव्य करायला पाहिजे, भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती व स्थावर मालमत्ता गोळा करणे म्हणजे महान कार्य अशी यांची समजूत असते. त्यांची आगेकूच याच दिशेने होते. समाजाचा रोख पण आता अशा अवैध मार्गांनी बनलेल्या नवश्रीमंतांप्रती तरी बदलल्याचे चित्र दिसते आहे. बाह्यतः समाज अशा व्यक्तींचा उदोउदो करताना दिसत आहे. पर्यायाने या वृत्तीमुळे भ्रष्टाचार लोकमान्य होतो, जास्त फोफावतो. देवघेव पद्धतीमुळे पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कुठलेही सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्य असो, त्याला अमाप पैसा लागतो. राजकीय पक्षांची तर बातच सोडा! या कार्यासाठी अनधिकृतपणे पैसा गोळा केला जातो. पैसा देणार्‍यांचा हेतू शुद्ध असतो. कारण देणारा याची पुरी फेड आपली अवैध कामे संमत करून घेतो. भ्रष्टाचाराची साखळी अशी अबाधित राहते. सत्तेवर असेपर्यंत वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे हा धर्मच झालेला आहे. नंतर कुत्रा पण खाणार नाही. मग हीच संधी साधून अमाप माया गोळा करायची. शिवाय खुर्चीचा वारस पुढे हीच परंपरा चालवणार तेव्हा आताची सुवर्णसंधी का दवडायची? या मनोभूमिकेतून भ्रष्टाचारास तार्किक बैठक लाभते. कायदेशीर कामांसाठी पण हातावर पैसे टेकवण्याची वृत्ती समाजात बोकाळली आहे. प्रामाणिक अधिकार्‍यांना पण पब्लिक अशा तर्‍हेने फशी पाडतो. पब्लिकला पण शासकीय औपचारिकतेचे सोपस्कार करायला वेळ कुठे असतो? तेव्हा कायदेशीर काम जरी असले अन् ते सहजसुलभ झाले तर थोडी बक्षिसी द्यायला यांचे हात कचरत नाहीत. असल्या वृत्तीमुळे भ्रष्टाचाराचा पाया हळूहळू व्यापक बनतो.

वाल्या कोळ्याला त्याच्या पापात वाटेकरी होण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. त्याक्षणी वाल्याच्या वाल्मिकीतल्या स्थित्यंतरास प्रारंभ झाला. आता याच्या विरोधात चित्र दिसत आहे. आजचे कुटुंबीय वाल्मिकीला वाल्याच्या दिशेने ढकलताना दिसताहेत. कमकुवत मनाचे राजकारणी, अधिकारी अशा आतून येणार्‍या दडपणाला बळी पडतात, प्रवाहपतित होतात. व्यवस्थेतील काही श्रद्धाळू व पापभीरू लोक भ्रष्टाचारापासून प्रारंभी अलिप्तच राहणे पसंत करतात. परंतु त्यांची निरीक्षण वृत्ती कार्यरतच असते. विचारसरणीला तर्कसंगतीची पार्श्‍वभूमी नसली तरी प्राथमिक विश्‍लेषण करण्याची मनाची क्षमता असते. आजूबाजूच्या परिस्थितीवर नाही म्हटले तरी यांचे लक्ष असतेच. पुण्यसंचय करणार्‍यांचे देव भलं करतो, पाप करणार्‍याला देव शिक्षा करतो अशा धोपटमार्गी तत्त्वज्ञान जगणार्‍या या वर्गाच्या भाबड्या मनाला जेव्हा देवाचे व भ्रष्टाचाराच्या नात्याचे स्वरूप दिसते तेव्हा हे हादरून जातात. यांना वाटत असते की देव त्यांच्या थोबाडीत मारेल (शाब्दिक अर्थाने नव्हे!). परंतु तसे होत नाही. आता देवाने यांच्या थोबाडीत दिली तर हा देवाचा प्रसाद समजून हे भ्रष्टाचारात जास्तच बरबटणार ही गोष्ट अलाहिदा. पवित्र मंदिराचा परिसर भ्रष्टाचार्‍यांच्या अस्तित्वाने प्रदूषित झाल्याचे हे पापभीरू लोक पाहतात. यातले लोक भ्रमनिरास झाल्यामुळे व गरजेपोटी भ्रष्टाचारास प्रवृत्त होतात. कारण एव्हाना त्यांची खात्री पटलेली असते की देवाच्या दरबारात भ्रष्टाचार्‍यांनी पण मानाचे स्थान प्रस्थापित केलेले असते. प्रखर वास्तवाची यांना जाणीव होते.

भ्रष्टाचारी व्यक्तीची वागणूक कै. राम गणेश गडकरी यांनी वर्णन केलेल्या एकच प्यालातील सुधाकरासारखी असते. पहिल्या अवस्थेत हा भ्रष्टाचार्‍याला सोडत नाही, दुसर्‍या अवस्थेत भ्रष्टाचार याला सोडत नाही अन् तिसर्‍या अवस्थेत दोघे एकमेकांना सोडत नाहीत. भ्रष्टाचार्‍याला ध्यानी, मनी, स्वप्नी भ्रष्टाचारच दिसतो.

भ्रष्टाचाराने झालेला दुष्परिणाम सहसा जाणवत नाही. तो दूरगामी असतो. मांजराच्या पावलांनी हा सायलंट किलर मार्गक्रमण करत असतो. याचा पहिला बळी असते व्यक्ती, नंतर समाज पण पोखरला जातो, देश अन् शेवटी निसर्गदत्त साधनसंपत्तीचा चढत्या क्रमाने र्‍हास होतो. भ्रष्टाचारामुळे अन्यायाला पुष्टी मिळते अन् पिळवणुकीला ऊर्जा मिळते. सार्‍या व्यवस्थेलाच कीड लागते. कायदा कागदावर राहतो. अत्याचार, जुलूम यांना बळ मिळते. अन् लोकशाहीच्या बुरख्याखाली जंगलराज प्रस्थापित होते. कायदा दुर्बलांना संरक्षण देण्यास तोकडा पडतो. अस्तित्वाच्या लढाईत सुसंस्कृत नागरिक पण लोकशाही मार्गाला सोडचिठ्ठी देऊन कधी घटनाबाह्य दबावगटाच्या केंद्राकडे आकर्षित होतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. लोकशाहीचे ठोकशाहीत रूपांतर होते. कारण काळ्या कृत्यांना कायद्याचा मुलामा दिला जातो.

इतिहासापासून बोध घेतला तर असे आढळते की असली स्थिती अंतर्गत विघटनाच्या प्रक्रियेला गती देते अन् परकी चक्राचे ढग स्वातंत्र्यक्षितिजावर गोळा होऊ लागतात. भ्रष्टाचारातून आलेले नियोजनबद्ध अराजक संथ व तरल असते. व्यवस्थेला भगदाड पडत नाही. ती हळूहळू सडत जाते. विनाशाकडची वाटचाल मात्र अटळ असते. हकनाक बळी जातो तो एक जाणीवपूर्वक विकसित केलेल्या संपन्न संस्कृतीचा.

भ्रष्टाचाराचा प्रतिबंध करण्यासंबंधी सर्व स्तरांवर अनास्थाच दिसून येते. हे चित्र देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भयावह आहे. हातांच्या बोटांवर मोजणार्‍या संस्था व व्यक्ती भ्रष्टाचाराच्या भस्मासुराशी यशस्वी लढा देताना आढळतात. परंतु त्यांची ही व्यवस्थेविरुद्धची लढाई विविध कारणांमुळे, दमछाक झाल्याने अपुरीच राहते. काही राजकारण्यांनी व विचारवंतांनी भ्रष्टाचार ही जागतिक प्रक्रिया आहे असे सांगून हात झटकल्याचे, पण प्रयत्न केल्याचे केविलवाणे चित्र दिसते आहे. बहुतेक लोकांना भ्रष्टाचाराच्या व्यापक संहारशक्तीची पुसट कल्पना पण आलेली नाही. या समस्येकडे गांभीर्याने बघण्याचा वकूब पण नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापाशी असल्या कामासाठी वेळ अन् इच्छा नाही. सर्वसामान्य मनुष्य या बाबतीत उदासीनच आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यात खारीचा वाटा उचलायला पण सुस्थितीतले लोक तयार नाही. संकट जोपर्यंत आपल्या दारासमोर उभे ठाकत नाही तोपर्यंत नाकासमोर बघून चालणे हा मध्यमवर्गीय बाणा. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सोडा, पण विचार करण्याचे कष्ट घ्यायला कोणी तयार नाही. अशा या अवसान हरवून बसलेल्या समाजाच्या मनात आपण भ्रष्टाचार समूळ नष्ट करू शकलो नाही तरी परिणामकारकरीत्या रोखू शकतो एवढा आत्मविश्‍वास आला तरी अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान लाभेल.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रत्येकाच्या मनात आत्मविश्‍वासाचे पुल्लिंग फुलवले आहे. वृद्धांपासून तरुणांपर्यंत, प्रौढांपासून कोवळ्या मुलांपर्यंत, बुद्धिजीवींपासून कष्टकर्‍यांपर्यंत, गावापासून शहरापर्यंत भ्रष्टाचाराविरुद्धचा आवाज उठतो आहे. चळवळीचा पल्ला व्यापक, सर्वसमावेशक होत आहे. अशावेळी समांतर पातळीवर पण प्रयत्न झाले पाहिजेत. तेही योग्य दिशेने, नियोजनपूर्वक. प्रामाणिक व योग्य कार्यकर्त्यांची निवड हा भ्रष्टाचारावर रामबाण उपाय होऊ शकेल. त्याचवेळी शासनयंत्रणेतील भ्रष्टाचारी मोहरे निवडून ठेवले पाहिजेत. शिक्षेची प्रक्रिया सुटसुटीत व गतिमान केली पाहिजे. निवड प्रक्रियेतला भ्रष्टाचार निपटून टाकला पाहिजे. प्रामाणिक कर्मचार्‍यांची गुणवत्ता प्रशस्तिपत्र देऊन जास्त टोकदार केली पाहिजे. ते जास्त नेकीने काम करणार असे वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या सेवेची पैशाने भरपाई न करता त्यांना सतत उत्तेजन देणे जरुरीचे आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणामुळे होणारा त्यांचा छळ त्वरित थांबायला हवा.

माहिती हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासनव्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी झाल्याचा आभास होतो. या कायद्याचा पण समाजकंटकांनी गैरवापर केल्याची उदाहरणे दिसून येतात. किंबहुना प्रामाणिक अधिकारीच या माहिती हक्कांतर्गत शिकार झाल्याचे किस्से ऐकू येतात. या कायद्याद्वारे मिळवलेल्या नव्वद टक्के माहितीचा उपयोग होताना दिसत नाही. विविध खात्यांतील माहिती अधिकार्‍यांच्या मौल्यवान वेळेचा अपव्यय होताना दिसतो आहे. नोकरभरती, निवड प्रक्रियेची माहिती काही उमेदवार, संस्था संकलन करताना आढळतात. परंतु याचा प्रभावी वापर केल्याची उदाहरणे अपवादात्मक. ब्लॅकमेकिंग किंवा खात्यांतर्गत हिशेब मोकळे करण्याकडे अर्जदारांचा कल दिसून येतो. सकारात्मक, रचनात्मक उपयोग सहसा कोणी करतच नाही. उमेदवारांच्या निवडप्रक्रियेतील त्रुटी दाखवून आपले उमेदवार घडविण्याचे प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. यास्तव या कायद्यातील त्रुटी दूर करून तो जास्त परिणामकारक कसा करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. नाहीतर हा कायदा हे भ्रष्टाचाराचे आणखीन एक कुरण ठरू शकेल. लोकपाल कायदा संमत झाला तर उच्च स्तरावरील भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडायला त्याचा फार उपयोग होईल यात शंका नाही. नवनवे सॉफ्टवेअर विकसित करून सरकारी खात्यांतील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे सोपे जाईल. यामुळे कामचोर, ढोंगी कर्मचार्‍यांचे बिंग उघडे पडेल व कार्यक्षम, कार्यतत्पर कर्मचार्‍यांचे काम वरिष्ठांच्या दृष्टिपथात येईल. मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल. यामुळे कामचोरी, ढोंगी कर्मचार्‍यांचे बिंग उघडे पडेल. प्रामाणिक अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळेल. यामुळे प्रामाणिक अधिकार्‍यांचे कार्यक्षेत्र जास्त व्यापक होईल. भ्रष्टाचार्‍यांचे सामाजिक खच्चीकरण हा एक भ्रष्टाचारावर जालीम उपाय होऊ शकेल. परंतु जेव्हा समाजमनच दुभंगावस्थेत असेल तर हा पर्याय परिणामकारक ठरत नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारली तर हे शक्य होईल. भावनेचा उद्रेक व साठीसमासी उद्भवलेल्या आंदोलनाने काही साध्य होणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला नियोजन, दिशा व सातत्य हवे. एखादी भ्रष्टाचारविरोधी त्सुनामी येऊन चालणार नाही. भ्रष्टाचार पहिल्यांदा मनातून नष्ट झाला तर त्याचे बाह्य परिणाम दिसू शकतील. परंतु हे करायला हवी राजकीय इच्छाशक्ती आणि समाजजागरण. कारण घेणार्‍यापेक्षा देणाराच भ्रष्टाचारास जास्त कारणीभूत असतो.