सरकारचे भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हेच मुख्य उद्दिष्ट आहे. सरकार अंत्योदय घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपातळीवर स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बोलताना काल केले. राज्यातील युवकांनी स्वकर्तृत्वाने पुढे आले पाहिजे. युवकांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी सर्व सहकार्य केले जाणार आहे. नवभारत निर्माणामध्ये सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. सर्वच क्षेत्रात सकारात्मक विचारांना चालना दिली पाहिजे. राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावण्यावर भर देण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील साधन सुविधा आणि सामाजिक विकासासाठी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उल्लेखनीय सेवेसाठीचे वर्ष २०१८ तील राष्ट्रपती पोलीस पदक पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांना प्रदेश करण्यात आले. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा तळेगावकर यांचा पोलीस राष्ट्रपती पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला. पोलीस कॉस्टेबल अविनाश नाईक यांचा उत्तम जीवन रक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वनरक्षक गौरीश गावकर यांचाही उल्लेखनीय सेवेसाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वर्ष २०१९ मधील राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस अधीक्षक अरविंद गावसं, पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले, साहाय्यक उपनिरीक्षक दत्ताराम नाईक, हेड कॉस्टेबल सुनील फाळकर, अग्निशामक दलाचे उपअधिकारी रोहीदास परब, फायर फायटर प्रकाश कन्नाईक यांचे अभिनंदन केले. यावेळी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सभापती राजेश पाटणेकर, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार आन्तोनियो फर्नांडिस, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, महापौर उदय मडकईकर, मुख्य सचिव परिमल राय व इतरांची उपस्थिती होती.
चतुर्थीपूर्वी पूरग्रस्तांना
प्राथमिक मदत
राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल केले.
राज्यातील विविध भागातील पुरामुळे घरे, शेती, साधन सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. पुरामध्ये घरे, मालमत्ता, शेती, बागायती, साधन सुविधांची हानी झाली आहे. येत्या २० ऑगस्टपर्यंत पुरामुळे झालेल्या हानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. गणेश चतुर्थीपूर्वी पूरग्रस्तांना प्राथमिक मदत दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.