भोममध्ये बगल रस्ता अशक्य; उड्डाण पूल उभारणार : काब्राल

0
7

>> केवळ 4 घरे पाडावी लागणार; कुठल्याही मंदिराला धक्का लागणार नाही

भोम गावातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी बगल रस्ता तयार करणे शक्य नाही. भोम येथे उड्डाण पूल (फ्लाय ओव्हर) उभारला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी भोम राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावित प्रकल्पाचे पत्रकारांसमोर सादरीकरण करताना पर्वरी येथे काल दिली.
रविवारी भोम येथील ग्रामस्थांनी सभा घेऊन महामार्ग रुंदीकरणाला विरोध दर्शवला होता. तसेच रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द न केल्यास आंदोलन आणि लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना केवळ चार घरे पाडावी लागणार आहेत. गावातील श्री सातेरी, श्री महादेव किंवा अन्य कुठल्याही मंदिराला हात लावला जाणार नाही. पाडल्या जाणाऱ्या चार घरांना प्रत्येकी 300 चौरस मीटर जमीन आणि घराच्या बांधकामासाठी पैसे दिले जाणार आहेत, असे काब्राल म्हणाले.
महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत सरकारने विधानसभेत सविस्तर माहिती दिली आहे; मात्र काही जणांकडून स्थानिकांची दिशाभूल केली जात असून, स्थानिकांना भडकवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप मंत्री काब्राल यांनी केला.

साबांखाच्या जागेत बेकायदा बांधकामे

  • सार्वजनिक बांधकाम खात्याने वर्ष 1992 मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भोम येथील जमीन संपादित केली होती. त्या जागेत अतिक्रमण करून काही बांधकामे करण्यात आली आहेत.
  • बांधकाम खात्याने महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीत उभारलेली बेकायदा बांधकामे तोडली जाणार आहेत. तूर्त बांधकाम खात्याच्या जागेत 5 बेकायदा बांधकामे असल्याचे आढळून आले आहे.
  • माणुसकीच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बाजूच्या बेकायदा गाड्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना दुकाने थाटण्यासाठी गाळे उपलब्ध केले जाणार आहे. मात्र त्या गाळ्यांसाठी शुल्क आकारले जाणार आहे, असे मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.