भोपाळमध्ये 1800 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

0
5

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 1800 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.

भोपाळजवळील एका कारखान्यातून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बागरोडा गावातील औद्योगिक परिसरात हा कारखाना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी (भोपाळ, मध्यप्रदेश) व सन्याल बने (नाशिक, महाराष्ट्र) यांना अटक केली आहे. भोपाळ येथील अमित चतुर्वेदी आणि नाशिकमदील सन्याल बने हे भोपाळच्या बागरोडा औद्योगिक परिसरात कारखान्याच्या नावाखाली मेफेड्रोन (चऊ) अंमली पदार्थाचे बेकायदेशीर उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुजरात एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी या कारखान्यावर छापा टाकण्यात आला होता. या वेळी येथे अमली पदार्थ मेफेड्रोन (एमडी) तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उघड झाले. सुमारे 5 हजार किलो कच्चा माल आणि तो बनवण्यासाठी वापरलेली उपकरणेही सापडली आहेत. यामध्ये ग्राइंडर, मोटर्स, ग्लास फ्लास्क, हीटर आणि इतर उपकरणे समाविष्ट आहेत. पुढील तपासासाठी हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कारखान्यात झडती घेतली असता एकूण 907.09 किलो मेफेड्रोन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत 1814.18 कोटी रुपये आहे.

रोज 25 किलो ड्रग्ज
आरोपी अमितचतुर्वेदी याने 6 महिन्यांपूर्वी कारखाना भाड्याने घेतला होता. एमडी ड्रग्ज तयार करण्याचे काम येथे केले जात होते. दररोज सुमारे 25 किलो एमडी बनवले जात असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील सुरत येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संबंध आढळून आल्यानंतर भोपाळमध्ये कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएस आणि एनसीबीने शनिवारी भोपाळ कारखान्यावर छापा टाकला.