– अनिलराज जगदाळे, भूकंपतज्ज्ञ
आजकाल आपण नैसर्गिक आपत्तीचे ङ्गटके सातत्याने पाहत आहोत. अशा आपत्ती येणार असल्याची पूर्वकल्पना नसल्याने अनेक लोकांचा नाहक बळी जातो. महाराष्ट्रात काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ माळीण गावात घडलेली ताजी दुर्घटना त्याचेच प्रतीक आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम होऊन तेथील डोंगराची दरड कोसळली आणि त्याखाली तब्बल ४० घरे दबून गेली. त्याचप्रमाणे ढिगार्याखाली १५० लोक अडकून पडले. किमान २५ जणांचा बळीही गेला असल्याचे सांगण्यात येते. हा आकडा आणखी वाढेल. सतत होत असलेल्या पावसामुळे हा डोंगरकडा कोसळला. पावसाच्या पाण्यामुळे डोंगरावरील दगड आणि माती वाहून आल्यामुळे या संपूर्ण गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या चिखलामुळे गावात जेसीबी नेण्यातही अडचणी येत होत्या.
दुर्घटनेनंंतर बचाव कार्य सुरू झाले. पण, गावात पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे त्यामध्येही अडचणी येत होत्या. हे भूस्खलन होण्याला त्या डोंगराच्या वरच्या बाजूला असणार्या कड्याचा खालचा उतार कारणीभूत आहे. हा उतार मंद होता. तेथे कड्यावरुन आलेले विदारण झालेले दगड आणि माती यांचे प्रमाण जास्त होते. वरच्या कड्यावरुन तुटून खाली आलेले विदारण झालेल्या दगडांमध्ये पोकळी निर्माण होते. त्या पोकळीमध्ये हळूहळू माती शिरायला लागते. दगडांच्या छिद्रातून सतत पाणी स्त्रवून त्यामध्ये मातीचे थर तयार होतात. एखाद्या वेळी त्या दगडांना भरपूर प्रमाणात पाणी मिळाले तर चिखल तयार होतो. असे झाल्यामुळे त्या दगडांच्या वरच्या दगडांचे आधार सुटतात आणि वरचे दगड मोठ्या प्रमाणावर खाली सरकायला लागतात. मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला तर त्या दगडांचा अपक्षय होतो. अपक्षय, उतार आणि पाणी या कारणांमुळे वरचे दगड खाली सरकतात. या दगडांना खाली जाण्यापासून अडवण्यासाठी मध्ये कोणताही आधार नसेल तर ते थेट पायथ्याशी कोसळतात. या डोंगरावर जेथून दरड कोसळली त्या भागात मोठी झाडे असल्यास दरडीचे दगड झाडांमुळे आपोआप अडतात. झाडे असलेल्या भागात अशी दरड पायथ्याशी कोसळताना दिसत नाही.
जेथे ही दुर्घटना घडली त्या माळीण डोंगराचा उभा कडा तुटला. त्यांनी खालच्या दगडांना धक्का देण्याचे काम केले. वास्तविक, हे दगड त्यामध्ये मातीचा चिखल झाल्यामुळे आधीच अस्थिर झाले होते. वरच्या कड्याच्या दगडांचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले. हे दगड बॅसाल्ट स्वरुपाचे आहेत. त्यांना मराठीत ‘अशीत अश्म’ असे म्हटले जाते. दगडांचे वेगवेगळे थर बसून हे दगड तयार होतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना काही अंतरावर मध्ये पट्टे असल्यासारखे वाटतात.
माळणी येथील डोंगरकड्याचा उभा सांधा असलेल्या दगडाचे अपक्षयन झाले. त्यामध्ये मातीही तयार झाली. त्यामुळे हा कडा खाली कोसळला. पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे त्यांचा तेथील आधार कमी झाला आणि हा कडा खाली आला. ज्या उतारावर तो कोसळला, तेथील दगड आधीच स्थिर नसल्याने हे सर्व दगड पायथ्याशी कोसळले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी अशा डोंगरकड्यांची पाहणी व्हायला पाहिजे हे खरे असले तरी आपल्या देशात, इतके डोंगर आहेत की त्यांचे सर्वेक्षण कसे करणार? ते शक्य नसले तरी अशा दुर्घटना टाळण्यासाठी काही गोष्टींची दक्षता मात्र नक्की घेता येईल. अशा डोंगराच्या उतारावरची झाडे तोडता कामा नयेत. किमान ज्या डोंगरांच्या पायथ्याशी गाव वसले आहे तेथे गावाच्या वरच्या भागातील डोंगराची पाहणी तरी करायला हवी. तसे झाले तरी अशा दुर्घटनेमध्ये होणारी मनुष्यहानी टाळणे शक्य होते. पण, ते करण्यात येत नाही. लोक निसर्गाच्या बाबतीत ङ्गार बेदरकारपणे वागतात. निसर्ग आपली काही हानी करणार नाही अशी भावना ठेवून निसर्गाला गृहित धरतात. लोक पूररेषेत बिनधास्त घरे उभारतात. डोंगराच्या उतारावरही ते घरांची निर्मिती करतात. अशा बेदरकारपणाचे ङ्गळ निसर्गाकडून नंतर मिळते. अशा दुर्घटना घडून गेल्यानंतर लोकांना उशिराचे शहाणपण येते. आपण असे करायला नको होते असे त्यांना नंतर वाटत राहते. उशिरा आलेल्या अशा शहाणपणामुळे अशा दुर्घटना घडत राहतात. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडण्याचे प्रमाण जास्त असते. इतर दिवसात दगड ङ्गुटून पडत नाहीत, असे नाही. पण तसे ते ङ्गुटले तरी ङ्गार मोठे नुकसान होत नाही.
अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. असे लोक डोंगराच्या पायथ्याशी राहत असतील तर त्यांनी डोंगरावर वृक्षतोड होणार नाही हे पहायला हवे. हे निसर्गासाठी नाही तर स्वत:च्या संरक्षणासाठी गरजेचे आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. डोंगराच्या पायथ्याशी वस्ती असेल आणि त्या डोंगरावर ङ्गार झाडे नसतील तर त्यांनी तेथे झाडे लावून संवर्धन करायला हवे.
मागच्या वर्षी नाशिकमध्येही अशी दुर्घटना घडल्यामुळे तेथील घाट बंद झाला होता. अलीकडेच पुण्याजवळील सिंहगडाचीही दरड अशीच कोसळली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी घाट तयार करतानाही पुरेशी काळजी घ्यायला हवी. डोेंगर पोखरुन रस्ते तयार करणे नेहमीच बरोबर ठरत नाही. अशा आपत्ती कोसळू नयेत म्हणून आधीच सावध व्हायला हवे.
पावसाळ्यात पाणी जास्त असल्यामुळे अपक्षय असणार्या दगडांमध्ये चिखल तयार होतो. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसल्यामुळे ङ्गार चिखल होत नाही. कधी तरी पाणी मिळाले तर तेथे थोडाङ्गार ओलावा निर्माण होतो. पण, ङ्गार चिखल झाल्यानंतर जशी परिस्थिती निर्माण होते तशी ती यावेळी होत नाही. त्यामुळे या दिवसात अशा दुर्घटना टळतात. आपण डोंगरावर काम करताना बेदरकारपणे उतार तयार केले आहेत. उतारावर अपक्षय असणारे दगड असतील तर त्यांना वरचे वजन झेपत नाही. त्यामुळे त्यांचा पाया आणखी कमकुवत होतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा दुर्घटना हमखास घडत राहतात.
कोकण रेल्वेचा ट्रॅक तयार करतानाही काही ठिकाणी पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही. ती घेण्यासाठी कराव्या लागणार्या कामांमुळे खर्चात वाढ होते म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नंतर भूस्खलन होऊन लोकांचे बळी जाण्यात त्याचा परिणाम होतो. डोंगरातून रस्ते तयार करताना करावा लागणारा खर्च आधी टाळण्यात आला तरी दुर्घटना घडून गेल्यानंतर तेथे खर्च करावा लागतोच. त्या खर्चाचे एक वेळ जाऊ दे. पण, यामुळे जिवितहानी होते त्याचे काय? माळीण दुर्घटनेचा धडा कोण घेईल काय?