विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घोषणा; भूस्खलनातील मृतांचा आकडा 210 वर
केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 210 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यात 83 महिला आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच 218 लोक बेपत्ता आहेत. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे आणि जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. या दौऱ्यानंतर काल राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केलेी. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस पक्ष 100 पेक्षा जास्त घरे बांधून देणार आहे, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.
मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चार गावांत 30 जुलैला पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले होते. मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे झोपेतच शेकडो जणांना मृत्यूने गाठले होते. या भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्यांखाली सापडून 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढत चालला आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी गुरुवारी वायनाडमधील बाधित क्षेत्रांचा दौरा आणि पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
काल या दुर्घटनेविषयी राहुल गांधींनी सांगितले की, मी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा केला. ही एक भयंकर दुर्घटना आहे. आम्ही गुरुवारी घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली. यावेळी प्रशासनाकडून आम्हाला या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि नुकसान झालेल्या घरांची संख्यांबाबत माहिती मिळाली. या पीडित भूस्खलनग्रस्तांसाठी 100 पेक्षा जास्त घरे काँग्रेस बांधणार आहे, असे राहुल गांधींनी सांगितले.
49 मुले बेपत्ता किंवा मृत
केरळमधील दुघटनेत आतापर्यंत 210 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 218 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याशिवाय 49 मुले बेपत्ता किंवा मृत झाल्याची भीती काल केरळचे मंत्री व्ही. शिवाकुट्टी यांनी व्यक्त केली. जवळपास 10000 लोकांना 94 आपत्कालीन केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.