भूसंपादन विधेयक शेतकर्यांच्या हिताचेच असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतकर्यांना दिली. मात्र या प्रकरणी कॉंग्रेस शेतकर्यांमध्ये गैरसमज पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारतर्फे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी दिले.मोदी यांनी आकाशवाणीवरून शेतकर्यांशी संवाद साधला. या संपूर्ण कार्यक्रमात मोदी यांचा भर भूसंपादन विधेयकावर होता. भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत, ज्यात भूसंपादन करता येते त्यात रेल्वे, खाण तसेच राष्ट्रीय महामार्ग यांचा समावेश आहे. याकडे त्यांनी शेतकर्यांचे लक्ष वेधले. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करून शेतकर्यांचे हित साधण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या विधेयकाद्वारे भूसंपादनावेळी शेतकर्यांना चौपट नुकसान भरपाई मिळेल. तसेच तेथे औद्योगिक कॉरिडॉर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळेल. प्रकल्पासाठी जागा देणार्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही मोदी यांनी दिले.