भूरुपांतर प्रकरणी राणेंसह तिघांची सीबीआय चौकशी करा : पाटकर

0
2

>> पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रारीतून मागणी

जमीन रुपांतर प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, राज्याचे मुख्य नगरनियोजक राजेश नाईक आणि नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी काल गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे केली आहे. काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर यांनीच वरील माहिती दिली.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या शेतजमीन व जंगल क्षेत्रातील जमिनीची रुंपांतरे होऊ लागलेली असून, त्याला मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, मुख्य नगरनियोजक राजेश नाईक व नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे हेच जबाबदार असल्याचे आपण तक्रारीत नमूद केले असल्याचे पाटकर म्हणाले. या प्रकरणी गोवा पोलीस कधीही कारवाई करू शकणार नाहीत. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी मागणी आपण लेखी तक्रारीतून केली असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.

परराज्यातील मोठमोठे बिल्डर्स गोव्यात येऊन जमीन खरेदी करू लागलेले असून, त्यात भूतानी, रेड्डी आदींचा समावेश आहे. डीएलएफ या बांधकाम कंपनीनेही मोठ्या प्रमाणात येथे जमीन खरेदी केलेली असून, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भूरुपांतरे केली जात असल्याचा आरोपही पाटकर यांनी यावेळी केला. नगरनियोजन कायद्यात 17 (2) ही दुरुस्ती आणलेली असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणात भूरुपांतरे केली जात असल्याचा आरोपही पाटकर यांनी केला.