भूतानी प्रकल्पाचा बांधकाम परवाना रद्द करण्याची मागणी

0
2

>> सांकवाळ येथे प्रकल्पाविरोधात सभा

सांकवाळ येथील भूतानी मेगा प्रकल्प रद्द करावा आणि उपोषणाला बसलेले माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांची बदनामी करू नये अशी भूमिका घेत रविवारी शेकडो ग्रामस्थ पंचायतीसमोर एकत्र आले. ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती. ‘सांकवाळ विरुद्ध भूतानी मेगा प्रकल्प’ या बॅनरखाली एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी प्रकल्पाला दिलेला बांधकाम परवाना रद्द करण्याची मागणी केली.

माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांच्या समर्थनार्थ काल रविवारी राजकीय नेते व स्थानिक लोक सांकवाळ येथे एकत्र आले. प्रेमानंद नाईक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा काल सातवा दिवस होता. सांकवाळ अगेन्स्ट मेगा प्रोजेक्ट या समूहाच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले, ज्यात गोव्यातील लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

कुठ्ठाळीचे आमदार आतोन वाझ यांनी भूतानी प्रकल्पाविरोधातील आपली भूमिका अधोरेखित करताना विधानसभेत तसेच पंचायत आणि इतर संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून या प्रकल्पाला विरोध केल्याचे सांगितले. सांकवाळचे विरोधी पंच तुळशीदास नाईक, आपचे आमदार क्रिझ सिल्वा, माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको, गोवा फॉरवर्डचे मोहनदास लोलयेकर, प्रतिमा कुतिन्हो यांनी आंदोलनास समर्थन दिले.
दरम्यान, नाईक यांच्या व्हिडिओविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आंदोलक प्रेमानंद नाईक यांचा खोटा व्हिडिओ व्हायरल

भूतानी प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषणावर बसलेले सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे अन्न व मद्यप्राशन करीत असल्याचा एक व्हिडिओ काल समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला. प्रेमानंद नाईक यांच्या समर्थकांनी या व्हिडिओविषयी संताप व्यक्त करताना तो बराच जुना व्हिडिओ असल्याचा दावा केला. भूतानीविरोधी आंदोलन सुरू केल्यामुळे प्रेमानंद नाईक यांना बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ समोर आणल्याचा आरोप केला आहे. आमरण उपोषणास बसलेले प्रेमानंद नाईक हे जेवण करत असल्याची खोटी माहिती पसरण्यामागे आंदोलनाचा फज्जा उडवण्याचे विरोधकांनी रचलेले कारस्थान असल्याचा आरोपही नाईक यांच्या समर्थकानी केलेला आहे.
वरील व्हिडिओ हा 21 ऑगस्ट 2024 चा असल्याचा पुरावा म्हणजे सदर व्हिडिओवरील ‘टाईम स्टॅम्प’ आहे, असे नाईक यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.