‘भूतानी’बाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले

0
13

>> आपल्याकडील खात्याने परवानगी दिली नसल्याचे केले स्पष्ट

साकवाळ येथे होऊ घातलेला भूतानी इन्फ्रा कंपनीचा प्रकल्प हा राज्य सरकारसाठी आता डोकेदुखी ठरू लागलेला असून, या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी आपल्याकडे असलेल्या कोणत्याही खात्याकडून भूतानी कंपनीच्या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली नाही, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या प्रकल्पासाठीचे भूरुपांतर कधी झाले हे तुम्ही शोधून काढा, असेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सागितले.

भूतानी इन्फ्रा कंपनीने साकवाळ येथे होऊ घातलेल्या आपल्या प्रकल्पासाठी निसर्गरम्य असा डोंगर कापण्याचे काम हाती घेतल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. स्थनिकांकडून आणि विविध बिगर सरकारी संघटनांकडून हा प्रकल्प रद्द केला जावा, अशी मागणी होऊ लागलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्पाला आपणाकडे असलेल्या कोणत्याही खात्याने परवानगी दिली गेली नसल्याचे काल स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी कुजिरा येथील शैक्षणिक प्रकल्पात भूतानी इन्फ्रा कंपनी पुरस्कृत एका कार्यक्रमाच्या वेळी बिगर सरकारी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तेथे निदर्शने करीत घोषणाबाजी केली होती.

मंगळवारी सकाळी एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी विचारले असता, त्यांनी भूतानी कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आपणाकडे असलेल्या कोणत्याही खात्याने या प्रकल्पाला मंजुरी दिलेली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकल्पासाठी भूरुपांतर कधी झाले?, सीआरझेड मंजुरी व बांधकाम परवाने कुणी व कधी दिले?, हे तुम्ही तपासून पहा, असे मुख्यमंत्री पत्रकारांना म्हणाले. भूतानी इन्फ्रा कंपनीच्या मालकाबरोबर काढलेला व सध्या व्हायरल होत असलेला तो फोटो एका वर्षापूर्वी काढण्यात आला होता. मी भूतानी कंपनीच्या मालकाला किंवा कोणत्याही प्रतिनिधीला भेटलेलो नाही, असा खुलासा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

दरम्यान, भूतानी इन्फ्रा कंपनीकडे या प्रकल्पासाठीचे आवश्यक ते परवाने आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी त्यांची फाईल मागवून घेण्यात येईल व त्यांच्याकडे आवश्यक ते परवाने नसल्यास त्यांच्या प्रकल्पाचे काम बंद पाडण्यात येईल, असे नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.