- वैद्य कांता जाधव भिंगारे
निसर्गाच्या जवळ जाणे, सजीव सृष्टीचे चक्र समजून घेणे, आपले मन, विचार आणि भावना यांना समजून घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, विपश्यना यांचा अभ्यास करणे खूपच गरजेचे आहे.
जगातील सर्व सजीव प्राण्यांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी उपजत निसर्गदत्त संवेदना/भावना असते ती म्हणजे भीती. भय ही नैसर्गिक संवेदना नसेल तर कोणताही सजीव प्राणी स्वतःच्या प्राणाला (जिवाला) सहज मुकेल. वाघ जेव्हा एखाद्या हरणाची शिकार करतो तेव्हा त्या हरणाला जिवाचे भय निर्माण होऊन त्याला वाघापासून दूर पळून जाण्याची प्रेरणा मिळते. सुरक्षित ठिकाणी पोहोचला की हरीण आपले खाण्यापिण्याचे कार्य चालू ठेवतो. तो विसरूनही जातो की थोड्या वेळापूर्वी आपण एका वाघाची शिकार झालो होतो.
मनुष्यप्राण्यालाही अशाच प्रकारची संवेदना निसर्गाने बहाल केली आहे, जेणेकरून कुठल्याही संकटातून त्याचा जीव वाचावा. पुढे धोका आहे आणि त्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे, अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम मनात भीती निर्माण होते. मग शरीरातील विशिष्ट कार्यप्रणाली कामास लागते. या भीतीचा सामना तीन प्रकारे केला जातो- युद्ध करणे (फाईट); पळून जाणे (फ्लाईट) आणि स्तब्ध उभे राहणे (फ्रीज). आलेल्या संकटावर ही प्रतिक्रिया अवलंबून असते. जसे की एखादा साप पुढ्यात उभा राहिला किंवा नजरेस पडला की शरीर स्तब्ध उभे राहते, जेणेकरून साप आल्या मार्गाने निघून जाईल व तो शरीरावर हल्ला करणार नाही किंवा चावणार नाही.
मनात भीती निर्माण झाली की हृदयाची धडधड वाढते. दरदरून घाम फुटतो. हातपाय थंड पडतात किंवा संपूर्ण शरीराला कंप सुटतो. स्वतःचा जीव वाचविण्यात यशस्वी झालो, आलेल्या संकटापासून दूर गेलो की वरील सर्व लक्षणे काही काळाने आपोआपच शांत होतात. थांबतात.
आजच्या काळात मनुष्य जीवनाचा विचार केल्यास तो समूहाने सुरक्षित ठिकाणी राहत आहे. त्याला स्वतःच्या उपजीविकेसाठी अन्नधान्य सहज उपलब्ध आहे. पूर्वीसारखे त्याला अन्नाच्या शोधात जंगलात भटकावे लागत नाही. त्यामुळे त्याला हिंस्त्र प्राण्यापासून किंवा इतर नैसर्गिक संकटांपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत नाही. मानवाने स्वतःचे निसर्गापासून दूर असे वेगळे विश्व निर्माण केले आहे. मात्र जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली भीती ही संवेदना कायम आहे. तेव्हा वाघ जरी समोर नसला तरी ताणतणावापासून निर्माण झालेल्या भीतीमुळे जीव वाचवण्याची यंत्रणा कामास लागते. मात्र पळून जाणे, युद्ध करणे किंवा स्तब्ध राहणे या प्रक्रिया होण्यास वावच नसतो. असे वारंवार घडल्याने शरीर-मनावर या प्रतिक्रियांचा वाईट परिणाम होऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. भीतीच मग आपल्या मनाचा ताबा घेते. त्यातून वेगवेगळे मानसिक विकार निर्माण होतात.
अशीच एक भीती सध्या जगभरातील अखिल मानवजातीला भेडसावते आहे ती म्हणजे कोरोनाची भीती. या मानवनिर्मित सामूहिक भीतीमुळे जणू मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मानवाचे संपूर्ण जीवनच या भीतीच्या सावटाखाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जगभर सर्व आघाड्यांवर सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिमाणे बदलली गेली आहेत. जग जवळ आले पण माणूस दुरावला आहे. माणसाचे माणूसपण हरवत चालले आहे.
लहानथोरांपासून ते गरीबश्रीमंतांपर्यंत सर्वच जण विशिष्ट प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जात आहेत. त्यात प्रसारमाध्यमांनी तर कहरच केला आहे. माहितीच्या मोहजालात प्रेक्षकांना अडकवून विकृत मनोरंजन उपभोगण्यात सर्व मश्गूल झाले आहेत. अयोग्य अर्धसत्य माहितीतून युवा पिढीलाही वेगवेगळ्या मानसिक समस्या भेडसावत आहेत. शारीरिक आरोग्याची सर्वजण सहज काळजी घेतात पण मानसिक आरोग्याची तेवढी काळजी घेताना दिसत नाहीत. गरज पडल्यास मनोविकार तज्ज्ञाची अवश्य भेट घ्यावी जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही.
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि कुठलीही गोष्ट कायम टिकत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था ठरलेल्या आहेत. एखादी गोष्ट निर्माण होते; काही काळ टिकते आणि नंतर नष्ट होते. मानवासाठीदेखील हाच नियम लागू होतो. जन्म होणे, काही काळ टिकणे व मृत्यू होणे हाच जर नियम प्रत्येकाने समजून घेतला तर त्याला कसलीच भीती राहणार नाही. तो निर्भयपणे जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
आलेल्या महामारीचाही अंत होणारच आहे. त्याची मनात भीती न बाळगता आपण आपल्या व्यक्तिगत आणि वैयक्तिक जीवनाची सजगतेने काळजी घेतली तर प्रत्येकाला यातून सावरायला मदत होईल.
निसर्गाच्या जवळ जाणे, सजीव सृष्टीचे चक्र समजून घेणे, आपले मन, विचार आणि भावना यांना समजून घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, विपश्यना यांचा अभ्यास करणे खूपच गरजेचे आहे. यातून आपण आपल्या चंचल मनाला शांत करून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.