भाषावाद का?

0
341

गोव्यामध्ये कोकणी – मराठी भाषावादाची भुतावळ पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न काही घटकांकडून सध्या पद्धतशीरपणे चाललेला दिसतो. दूर दिल्लीतून आधी याची चूड दाखवली गेली आणि आता गोव्यात शिमगा सुरू झाला आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे धूर्तपणे चालले आहे याची जाणीव या घडीस समस्त गोमंतकीय भाषाप्रेमींनी ठेवणे आणि संयम राखणे गरजेचे आहे. दिल्लीतील कोकणी अकादमीसंदर्भात जो काही वाद सध्या अकारण उपस्थित केला गेला आहे, त्यातील एक गोष्ट लक्षणीय आहे ती म्हणजे तिला विरोध करणारे आणि त्या विरोधाला प्रत्युत्तर देणारे या दोन्हींमध्ये एका विशिष्ट राजकीय पक्षाचे सहानुभूतीदार लोकच प्रामुख्याने आहेत हाही निव्वळ योगायोग नसावा.
दिल्लीमध्ये कोकणी अकादमी स्थापन करण्याची जी घोषणा आम आदमी पक्षाने केली आहे ती कशी निव्वळ राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि दिल्लीतील विविध भाषांच्या अकादम्यांची सद्यस्थिती काय आहे ते आम्ही यापूर्वीच सप्रमाण समोर ठेवले आहे, परंतु त्यामागील भूमिका या घोषणेतील फोलपणा दाखवून देणे एवढाच होता. दिल्लीमध्ये कोकणीसाठी अकादमी उभी राहत असेल तर ती चांगलीच बाब आहे, तिला कोणी विरोध करण्याचे काही कारण नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवरून त्याविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करणारे आणि त्याला प्रत्युत्तराच्या नावाखाली राज्यातील भाषिक सलोख्याला सुरुंग लावू पाहणारे यांनी गेले काही दिवस राज्यात जे काही चालवले आहे तो सारा उथळ पोरकटपणा आहे आणि तीच त्यांची आजवरची ओळख आहे. मराठी भवनासमोर कोकणी अस्मिताय जागोरच्या नावाखाली नुकतीच निदर्शने केली गेली. राज्यातील भाषावाद ऐन शिखरावर असताना देखील असा प्रकार पूर्वी कधी झालेला नव्हता. यातील ढोंग तर एवढे की सरकारच्या मराठी अकादमीकडून अनुदान घेऊन स्वतःची पुस्तके प्रकाशित करणारी मंडळीही मराठीला शिव्याशाप देत तेथे उभी होती. हा सगळा उथळ थयथयाट कोणत्या भाषेचे काय हित साधणार आहे?
राज्यातील एकेकाळच्या भाषिक वादाची धग ओसरल्यानंतर भारतीय भाषांचे समर्थक एकत्र आल्याने एक चांगले वातावरण राज्यात निर्माण झाले होते. त्यातून भाषिक सलोखा आणि सौहार्दही दिसून येत होते. कोकणीच्या प्रगतीसाठी गोवा सरकारची कोकणी अकादमी, मराठीच्या प्रगतीसाठी मराठी अकादमी आज कार्यरत आहेत. दोन्ही भाषांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करीत आहेत. लोक आपल्याला हव्या त्या भाषेतून लिहित आहेत, नवे लेखक घडत आहेत, त्यांची पुस्तके प्रकाशित होत आहेत. हा सगळा भाषिक, वाङ्‌मयीन व्यवहार अधिक सखोल आणि सशक्त करण्यात योगदान देण्याऐवजी अकारण दुसर्‍या भाषेचा द्वेष करण्यात आपली शक्ती खर्चिल्याने काहीही साध्य होणारे नाही. ज्यांची हयात असा द्वेष करण्यात गेली, त्यांचे वाङ्‌मयीन कर्तृत्व काय हेही आता तपासावे लागेल. अशा द्वेषभावनेतून दुसर्‍या भाषेचे काही वाकडे तर होणार नाहीच, आणि स्वतःच्या भाषेचेही काही भले त्यातून साधणारे नाही. तरी देखील पुन्हा एकदा कोकणी आणि मराठी भाषाप्रेमींदरम्यान अकारण तेढ निर्माण करण्याची धडपड काही घटकांनी पद्धतशीरपणे चालवलेली आहे. त्यासाठी लोकांना उचकावले जात आहे, टीकाटिप्पणीसाठी, आंदोलनासाठी उद्युक्त केले जात आहे, त्यामागे खरोखर भाषाप्रेम आहे की काही अन्य प्रेरणा आहेत?
केवळ दूर कुठेतरी दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन झाली म्हणजे कोकणीचे भले होईल असे नव्हे. कोणतीही भाषा ही सरकार आणि धनवंतांच्या आश्रयाने मोठी होत नसते. तिला लोकाश्रय असावा लागतो हे आम्ही यापूर्वीही नमूद केले आहे. भाषेच्या कृत्रिम ‘भेंब्रीकरणा’तून तिचा मूळचा गोडवा हरवू देण्यापेक्षा तिचे मूळ रूपामध्ये बहुजनीकरण झाले तरच तिला ही स्वीकारार्हता लाभेल. कोणत्याही भाषेचा विकास साधण्यासाठी, ती भाषा समृद्ध करण्यासाठी नवनव्या जीवनांगांवर त्यामधून सशक्त लेखन व्हावे लागते, कालसुसंगत नवे प्रवाह साहित्यामध्ये यावे लागतात. त्यासाठी साहित्यिकांदरम्यान भाषिक आदानप्रदान, संवाद ही गोष्ट गरजेची असते. इतर भाषांचा द्वेष केल्याने काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे असा संवाद निर्माण होण्यासाठी मुळात परस्परांप्रतीचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. साहित्यबाह्य गोष्टींना साहित्याच्या प्रांतामध्ये शिरकाव करू दिला जाता कामा नये. निवडणुका येतील नि जातील. समाजामध्ये दूही निर्माण करणे हेच काम राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आजकाल करीत असतात. हा सापळा आहे आणि राज्यातील भाषाप्रेमींनी या सापळ्यामध्ये अडकता कामा नये. आपापल्या भाषेचे हित साधण्यासाठी सगळे मार्ग आज खुले आहेत. त्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून भलत्या गोष्टींमध्ये वेळ आणि शक्ती का दवडता आहात?