भाषणाची सक्ती, दुखवट्याची सुटी… काहींचा गोंधळ, काहींचा पळ

0
95

गोव्याचे माजी राजपाल महमद फजल यांचे गुरुवारी निधन झाल्याबद्दल दुखवटा म्हणून सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे काल दुपारी भोजनानंतर अर्धा दिवस सुटी जाहीर करण्यात आली त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकवण्यासाठी काल संध्याकाळपर्यंत शाळा चालू ठेवण्याच्या निर्णयाचे काय करावे हा शिक्षकांसमोर प्रश्‍न निर्माण झाला.
सचिवालयातून जारी केलेल्या सुट्टीच्या आदेशाची माहिती काल दुपारी सर्वत्र पसरली. त्यामुळे खात्री करून घेण्यासाठी अनेक कर्मचार्‍यांकडून वर्तमानपत्रांच्या कार्यालयात फोन घणघणत होते. पणजी, म्हापसा, फोंडा या भागातील सरकारच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना वरील वृत्त मिळाल्याने ते भोजनानंतर कार्यालयातील काम बंद करून घरी परतले. परंतु काणकोण, सांगे अशा भागातील कर्मचार्‍यांना सुट्टीची खात्री करून घेण्यासाठीच संध्याकाळपर्यंत वेळ द्यावा लागला.
शिक्षण खात्याला काल दुपारपर्यंत या वृत्ताची माहिती नव्हती. संचालक गजानन भट यांना दुपारी २ वाजता माहिती मिळाल्यानंतर मोदींचे भाषण ऐकवण्यासाठी दुपारी ४.४५ पर्यंत विद्यालये खुली ठेवण्याच्या निर्णयाचे काय करावे हे कळणे कठीण झाले. सरकारने राज्यात सुटी जाहीर केल्याने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे टाळणार्‍या शिक्षकांचे काहीही बिघडणे आता शक्य होणार नाही. आपल्या दैनंदिन कामासाठी अनेक लोक काल दुपारी सरकारी कार्यालयांमध्ये आले होते. अकस्मात सुट्टी जाहीर झाल्याचे कळल्याने त्यांची तारांबळ उडाली.
दरम्यान, मोंदीचे शिक्षक दिनाचे भाषण ऐकवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांवर सक्ती करण्याच्या निर्णयावर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांकडून कडवट प्रतिक्रिया सुरू होत्या. सुट्टी जाहीर झाल्याने या वादावर पडदा पडला.
शिक्षण संचालकांशी संपर्क केला असता, त्यांनीही आपल्या कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर केल्याचे सांगितले. शिक्षकदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यास सक्ती नसेल, असेही ते म्हणाले.