भावी पिढीच्या भवितव्यासाठी ः ‘वनमहोत्सव’

0
328
  • पौर्णिमा केरकर

वनमहोत्सव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कित्येक जण ही बांधीलकी आजही जतन करीत आहेत. वृक्षांचे जीवन म्हणजे एक आगळावेगळा सुगंध. त्याची मुळे जमिनीत खोलवर जाऊन स्वतःसाठी जीवनरस शोषतात… मानवी मनाला जीवन जगण्याचा संदेश देत तो सर्वदूर पसरतो. तो संदेश ओळखून कार्यरत राहिलो तरच मानवी अस्तित्व टिकेल.!

महोत्सव म्हटला की प्रचंड उत्साह… अमर्याद आनंद… आणि वातावरणात भरून राहिलेले चैतन्य… याचीच अनुभूती येते. गोव्यात तर संपूर्ण वर्षभर सण, उत्सव, महोत्सवांची रेलचेल दिसून यायची.
मार्च, एप्रिल, मे आणि जून हे महिने तर अशाच सांस्कृतिक, साहित्यिक, चित्रपट महोत्सवाचे. महामारीच्या वाढत्या प्रकोपापुढे कोणाचेच काहीही चालत नसल्याने हे सर्वच उपक्रम- महोत्सव ठप्प पडले. सांस्कृतिक साहित्यिक महोत्सवांच्या आयोजनातून रंजन आणि बोध दोन्हीही साधले जायचे. परंतु आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत असे महोत्सव घेणे शक्य होणार नाही. असे असतानाही असा एक महोत्सव आहे जिथं कोणत्याही तर्‍हेचे बंधन तो साजरा करण्यासाठी येणार नाही. असा हा महोत्सव म्हणजेच ‘वनमहोत्सव’. गेला आठवडाभर हा महोत्सव गोव्यात ठिकठिकाणी साजरा केला जात आहे. तशा बातम्याही वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. खरं तर वनमहोत्सव साजरे करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे ही गरज ओळखून तशीच पावले पुढे टाकायला हवीत. इतर महोत्सवासाठी माणसे एकत्र यावी लागतात. जिथे गर्दी जास्त असते तो महोत्सव यशस्वी झाला असे मानले जाते. मग त्यामधून आपण किती आणि काय घेतले याच्याविषयी काहीही देणे-घेणे नसते. परंतु ‘वनमहोत्सवाच्या’ बाबतीत मात्र तसे आपल्याला करता येणार नाही आणि म्हणूनच हा उत्सव नुसता रंजनासाठी नाही तर येणार्‍या पिढीच्या भवितव्यासाठी त्याची गरज आज फार मोठ्या प्रमाणात आहे.

महोत्सव नावापुरते नकोत…

कोरोनाच्या या महामारीत सगळेजण आपापल्या घरात आहेत आणि अशा पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाला स्वतःच्या जगण्याचा विचार करता येतो. निरामय निरोगी जीवन जगण्यासाठी आपण हरघडीला घेतो तो श्वास महत्त्वाचा असतो आणि हा श्वास जर आपल्याला कोणी देत असतील तर ती झाडे आहेत. आज आपण बघतो… सभोवताली सिमेंट कॉंक्रीटची जंगले वाढत आहेत. लोकसंख्या वाढीमुळे निवाराही गरजेचा झालेला आहे. असे असताना झाडे भुईसपाट करायची आणि त्यावर टोलेजंग इमारती उभारायच्या. जी झाडे कापलेली असतात त्यांच्या जागी एकही झाड लावले जात नाही. जर असं असेल तर आपली जंगले वाढणार तरी कशी? म्हणूनच हे महोत्सव साजरे करताना फक्त प्रसिद्धीसाठी नसून त्याद्वारे आमचा समाज, प्रदेश निकोप राहायला हवा. येणारा काळ खूप कठीण आहे. आपल्या तरुणाईला आपल्या जंगलांची ओळख करून देण्यासाठी, आपली पारंपरिक झाडे, त्यांचे महत्त्व, फायदे यांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी महोत्सव महत्त्वाचे आहेत. महोत्सव हे फक्त मिळवण्यासाठी नाहीयेत तर त्यातून समाजामध्ये हरित क्रांती व्हायला हवी. एका बाजूला आपण वनमहोत्सव यासारखे इव्हेंट साजरे करतो तर दुसर्‍या बाजूला मोठमोठे आयटी प्रकल्प उभारण्यासाठी संपूर्ण जंगलाचा विध्वंस केला जातो. हे कुठपर्यंत चालेल? याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. राज्य पातळीवरून साजरे केले जाणारे महोत्सव नुसते नावापुरते असता कामा नयेत तर त्यात वास्तवाला अनुसरून समाजाला जागे करण्यासाठी तळमळ आणि कळकळ असणार हे गृहीत धरूनच त्यांचे साजरीकरण व्हायला हवे.

वृक्षारोपणाची परंपरा तशी जुनीच

आपल्या पूर्वजांनी अनेक सण उत्सवांची परंपरा निर्माण केली… ज्येष्ठातील वटपौर्णिमा असुदे, श्रावण महिन्यामध्ये येणारे नागपंचमी- चतुर्थी उत्सव घेतले तर निसर्ग आणि माणूस यांचे अनुबंध अनेक वर्षांचे आहे… याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. वटपौर्णिमेला वडाची पूजा सांगितली गेली. तथाकथित स्वतःला सुशिक्षित समजण्यात, शिक्षित समजण्यात धन्यता मानणार्‍या समाजमनाने पूर्वजांना अडाणी अंधश्रद्धाळू ठरवले. अशा पूर्वजांना अडाणी ठरवले की ज्यांनी वटपौर्णिमेला वडाची पूजा करा म्हणून सांगितले, झाडे राखून ठेवण्यासाठी देवराईची संकल्पना राबविली आणि आज मात्र विज्ञान युगात वावरणारा हाच सुशिक्षित समाज वडाच्या फांद्या छाटून, त्याची पाने ओरबाडून वटपौर्णिमा साजरी करतो. आपण आपल्या मनाला प्रश्‍न विचारायचा- वडाची पूजा करणारे ते अंधश्रद्धाळू की फांद्या छाटून त्यांची प्रतिमा प्रतीकात्मक पूजा करणारी नवी विज्ञानयुगात वावरणारी पिढी अंधश्रद्धाळू? हा असा वृक्ष आहे की जो जास्तीत जास्त प्राणवायू पुरवतो. प्राणवायूशिवाय माणसांचे जगणेच मुळी अशक्य आहे. असेही वृक्षाच्या फांद्या छाटल्या तर तो बहरणार तरी कसा? हेच मुळी या सुशिक्षित समाजाच्या लक्षातच येत नाही. चतुर्थीच्या वेळी ज्या ठिकाणी गणेशाची मूर्ती पुजली जाते त्या तिथं त्याच्या डोक्यावर माटोळी बांधली जाते. या माटोळीला रानातील पत्री, फुले, भाज्या, औषधी वनस्पती, काही फळे या सगळ्यांचा वापर माटोळीला बांधण्यासाठी केला जातो. गणपतीची मूर्ती तर मृण्मयी मातीची आणि या मातीमध्ये जे पेरतात ते उगवण्याची प्रचंड क्षमता असते. झाडांमुळेच तर मानवी अस्तित्व तग धरून आहे. पूर्वीची जंगले बघितली… घराच्या आसपासचा परिसर अनुभवला तर मग आपली पारंपरिक झाडे लोकमानसाने किती निगुतीने लावली होती याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. घर बांधले जाणार तर मग तिथं आंबा, फणस, माड असायला हवे हा त्यांचा शिरस्ता होता. घराच्या मागच्या बाजूला केळ असायची, तसेच एखादं शेवग्याचे झाड परसबागेला शोभा द्यायचे. अंगणात कडे-कुशीला अनेक फुलझाडे होती. किंबहुना अशी फुलांची बाग तयार करणे हे घराघरांतील गृहिणीचे कर्तव्य मानले जायचे. ही गृहिणी मात्र या सगळ्या फुलझाडांशी मनातळातून जोडलेली होती आणि म्हणूनच तिथं प्राजक्त असायचा, मोगरीचा वेल, जाईजुईचे झुडूप, सोनचाफा.. अशी सगळीच झाडे परिसराची शोभा वाढवायची. वनमहोत्सव फक्त मिरविण्यासाठी नसून ती काळाची गरज आहे. वृक्षारोपण ही गोष्ट आजकालची नाही. ती तशी खूप जुनी आहे. आपली भूमी एकेकाळी वनसंपदेने समृद्ध होती. मात्र मानवी वसाहती, उद्योगधंदे करण्यासाठी वारेमाप वृक्षतोड झाली. त्याचे परिणाम वैश्विक तापमान वाढीच्या माध्यमातून सोसाव्या लागणार्‍या चटक्यातून लक्षात येतात. प्राचीन काळात आपल्या सर्वच ऋषिमुनींचे आश्रम वनांमध्येच असत. दाट जंगलझाडी, पशुपक्षी, निर्झर, डोंगर, अशा वातावरणात ऋषींना चिंतन-मननासाठी प्रेरणा मिळे. आपल्या भूमीत विविधतेची तर्‍हेची नैसर्गिक वने होती. राजा-महाराजांच्या कालखंडात मनात विहार करण्यासाठी तत्कालीन काळातील जनता या सर्वांगसुंदर वनांचा लाभ घ्यायची. गोव्यातील धालोत्सव हा तर वनदेवतेचा उत्सव. पौष महिन्यामध्ये येणार्‍या ह्या उत्सवात पाच रात्री वनदेवतेचा जणूकाही जागर केला जातो. याच महिन्यात आंब्यांना मोहर आलेला असतो. लोक-गायिकांच्या ओठातूनही मग गाणी स्रवतात. त्या म्हणतात –

दारातला आमोगे चवरानी बोले गे
वनदेवती माया माणार येता परसादी बोले गे ..

आंब्याप्रमाणेच दारातली मिरवेल आणि इतरही अनेक उल्लेख या लोकगीतातून आपल्याला अनुभवता येतात. एकूणच झाडे लावणे हे फक्त महोत्सवापुरते मर्यादित नव्हते, तर आपल्या लोकमानसाची ती एक गरज बनलेली होती. संस्कृती… संस्कार… होता. घराच्या अंगणात तुळस असते, तिला केवळ धार्मिक अधिष्ठान नव्हते, ती पाठराखण करायची घरातील सदस्यांची. घरातल्या मालिनी आपल्या सौभाग्य लेण्यांचे दान हक्काने तिच्याजवळ मागायच्या.

दारातले तुळशी गे पानंपानं फुलंशी गे,
कपाळाच्या कुंकवासाठी किती लोकं वनवासी गे ..

आज जंगलांची वारेमाप तोड होत आहे. पूर्वजांचा वारसा आणि वसा आम्ही विसरत चाललेलो आहोत. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा सांगितलेले आहे – जिथं निसर्गाच्या सौंदर्यस्थळांच्या खाणाखुणा आहेत त्याठिकाणी कधीही न थांबणारी माणसंसुद्धा थोडा विसावा घेतात. अशाच सौंदर्यासक्त जागा गेल्यावर अस्थिर मनोवृत्तीची माणसे शांत होतात. ते पुढे म्हणतात –

अमृताचे पाडे
मुळेहीसकट गोडे
जोडती दाटे झाडे
सदाफळती
पाऊला पाऊला उदके
परि वर्षाकाळीही चोखे
निर्झर का विशेखे
सुलभे जेथ असे हे वृक्षपुराण…

परमात्म्याची प्राप्ती ती हीच असावी.
ब्रह्मगिरीवरील निरंजन वनात फुललेल्या केशवाचा रस आकंठ प्राशून
घेण्यासाठी चांगदेवाना भ्रमर व्हावे लागले. वृक्षपुराण तसे संपणारे नाही. अशी महान परंपरा असूनही आजची आपली वागणूक खेदजनक म्हणावी लागेल. ओमानचे विद्यमान सुलतान यांचे शिक्षण भारतात झाले. माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे त्यांचे शिक्षक. शिक्षण संपवून आपल्या देशात गेल्यावर त्यांनी महामार्गाच्या दुतर्फा कडुनिंबाची झाडे लावली. एक परकीय व्यक्ती, आपल्या देशाकडून प्रेरणा घेते… आपल्या देशात बदल घडवून आणण्याच्या दिशेने पाऊल टाकते… यशस्वीही होते. आपलं काय? यासाठी आत्मपरीक्षण व्हायला हवे. आजघडीला माणूस आणि निसर्ग, वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. राखीव जंगलक्षेत्र कापून जाळून टाकण्यापर्यंत सर्वसामान्य लोकांची मजल गेली आहे, तर दुसर्‍या बाजूला नवनवीन बहुउद्देशीय प्रकल्पाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून जंगलतोड होत आहे आणि याच पार्श्‍वभूमीवर फोटोपुरते एखादे झाड लावून त्याला प्रसिद्धी देत वनमहोत्सव साजरे होत आहेत. हे असे करून आम्हीच आमच्या पायावर कुर्‍हाड मारून घेणार. त्यासाठी वेळीच जागे होऊन वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व ओळखुया. विद्यार्थी, युवा यांनाही राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, समाजसेवी, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वावरणार्‍या संस्थांना जोडून घेत वृक्षारोपणाचे महत्त्व कळवूया. सौंदर्याचा आस्वाद ओरबाडून नव्हे, तर त्याला कुरवाळत, त्याच्यावर प्रेम करीत घ्यायचा असतो हे मनाला पटवूया. वनमहोत्सव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कित्येक जण ही बांधीलकी आजही जतन करीत आहेत. वृक्षांचे जीवन म्हणजे एक आगळावेगळा सुगंध. त्याची मुळे जमिनीत खोलवर जाऊन स्वतःसाठी जीवनरस शोषतात… मानवी मनाला जीवन जगण्याचा संदेश देत तो सर्वदूर पसरतो. तो संदेश ओळखून कार्यरत राहिलो तरच मानवी अस्तित्व टिकेल.!