आमदार वीरेश बोरकरांकडून स्पष्ट
आपला भाऊ किंवा आरजी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात आपण पाठिंबा दिलेला नाही किंवा तपास यंत्रणेवरसुद्धा दबाव आणलेला नाही. तसेच, कायदेशीर कारवाईमध्ये ढवळाढवळ केलेली नाही, असे स्पष् टीकरण सांतआंद्रेचे आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी काल केले.
आमदार विरेश बोरकर यांचे बंधू साईश बोरकर व तिघांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीनंतर आगशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने आपल्या कुटुंबीयांना भरपूर मनःस्ताप सहन करावा लागत आहे, असे आमदार बोरकर यांनी म्हटले आहे.
सदर घटना ही वैयक्तिक पातळीवर घडलेली आहे. या घटनेमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचारी किंवा आरजी पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता यांचा सहभाग नाही. त्या घटनेबाबत त्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरण न्यायालयातसुद्धा पोहोचले आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृतीचे समर्थन करणार नाही. दोषी ठरणाऱ्या व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असे आमदार बोरकर यांनी स्पष्ट केले आहे.