अश्विनने घेतलेले चार बळी व त्याला बुमराह व उमेश यादवची तोलामोलाची साथ लाभल्याने भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ७२.१ षटकांत १९१ धावांत संपवला. पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर भारताने दिवसअखेर १ बाद ९ धावा केल्या आहेत.
पहिल्या दिवसाच्या ६ बाद २३३ धावांवरून काल पुढे खेळताना भारताचा पहिला डाव २४४ धावांत संपला. नाबाद फलंदाज साहा व अश्विन यांना भारताचा डाव लांबवणे शक्य झाले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ तर पॅट कमिन्सने ३ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाला आपल्या पहिल्या डावात प्रभावी कामगिरी करता आली नाही. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दिलेल्या जीवदानांमुळेच त्यांना दोनशेच्या आसपास मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार टिम पेन याने नाबाद ७३ धावा करत चिवट प्रतिकार केला. परंतु, दुसर्या टोकाने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. स्टीव स्मिथचा महत्त्वाचा बळी अश्विनने घेतला. स्मिथला केवळ एक धाव करता आली. अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये त्याला सुरेख झेल घेतला. जलदगती गोलंदाज उमेश यादवच्या एका खाली राहिलेल्या चेंडूवर लाबुशेन पायचीत झाला. अश्विनने आपल्या १८ षटकांत ३ निर्धाव षटकांसह ५५ धावांत ४ गडी बाद केले. उमेशने ४० धावांत ३ तर बुमराहने ५२ धावांत २ बळी घेतले. भारताच्या दुसर्या डावात पृथ्वी शॉ (४) अपयशी ठरला. सलग दुसर्यांदा त्याचा त्रिफळा उडाला. दिवसअखेर अगरवाल ५ व नाईट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळत होते. बुमराहने ११ चेंडूंचा सामना करताना खाते खोलले नव्हते.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद २४४
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद १९१ (वेड ८, बर्न्स ८, लाबुशेन ४७, स्मिथ १, हेड ७, ग्रीन ११, पेन नाबाद ७३, कमिन्स ०, स्टार्क १५, लायन १०, हेझलवूड ८, उमेश ४०-३, बुमराह ५२-२, शमी ४१-०, अश्विन ५५-४) भारत दुसरा डाव ः १ बाद ९ (शॉ ४, अगरवाल नाबाद ५, बुमराह नाबाद ०, कमिन्स ६-१)