भारत-विंडीज पहिली कसोटी आजपासून

0
121

येथील सर व्हिवियन रिचडर्‌‌स स्टेडियमवर भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस पोषक असण्याची शक्यता असून फलंदाजांची खरी कसोटी या खेळपट्टीवर लागणार आहे. भारताने २००२ पासून वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे ही विजयी मालिका कायम राखण्याची सुरुवात कोहलीचे शिलेदार करणार आहेत.

भारतासमोर संघ निवड हा प्रमुख प्रश्‍न आहे. सलामीला अगरवालसह डावाची सुरुवात करण्यासाठी लोकेश किंवा विहारी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. या दोघांना संघात घेतल्यास रोहित शर्माला ‘अंतिम ११’मध्ये संधी मिळणे कठीण आहे. अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असल्याने त्याला वगळले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. यष्टिरक्षकाच्या जागेसाठी साहा व पंत यांच्यात चुरस असली तरी पंतला संधी मिळणे अपेक्षित आहे. खेळपट्टीवर जास्त हिरवळ असल्यास रवींद्र जडेजाच्या रुपात केवळ एक फिरकीपटू खेळणे अपेक्षित आहे. अन्यथा अश्‍विन त्याच्या जोडीला असेल.

डॅरेन ब्राव्हो, क्रेग ब्रेथवेट या अनुभवी फलंदाजांवर विंडीजची मदार असेल. संघातील सर्वांत परिपक्व फलंदाज म्हणून ओळख असलेल्या शेय होपकडून खूप अपेक्षा आहेत. फलंदाजी विभागात जॉन कॅम्पबेल व शामराह ब्रुक्स यांच्यात एका जागेसाछी चुरस असून शेन्नन गेब्रियल व जेसन होल्डर या दोन वेगवान गोलंदाजांची जागा निश्‍चित आहे. तिसर्‍या वेगवान गोलंदाजासाठी किमार रोच, किमो पॉल यांच्यापैकी एकाला त्यांना निवडावे लागेल. उंचपुरा अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉल या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याच्या जोडीला अनुभवी रॉस्टन चेज असेल.

भारत (संभाव्य) ः मयंक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा व जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडीज (संभाव्य) ः क्रेग ब्रेथवेट, शेय होप, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर, शामराह ब्रुक्स, रॉस्टन चेज, शेन डावरिच, रहकीम कॉर्नवॉल, जेसन होल्डर, किमार रोच, शेन्नन गेब्रियल.