भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन लढतींच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघ या सामन्यात विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार असून लोकश राहुल आणि ऋषभ पंत पुढील वर्षी होणार्या टी-२० विश्वचषकात आपली जागा निश्चित करण्याच्या ध्येय बाळगून असतील.
भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणार्या टी-२० विश्वचषकासाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताच्या बर्याचशा खेळाडूंचे स्थान निश्चित झालेले नाही आहे. त्यामुळे हे खेळाडू या मालिकेत सरस कामगिरी करून संघ व्यवस्थापन आणि निवड समतिचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचे काम करतील.
डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या साथीत लोकेश राहुलच येईल हे जवळपास निश्चित आहे. राहुलने ३१ टी-२० लढतींतून ४२.७४च्या सरारीने ९७४ धावा बनविलेल्या आहेत. ११० ही त्याची सर्वाधिक खेळी आहे. राहुल व्यतिरिक्त युवा व प्रतिभावंत यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतसाठीही ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल. त्याला जबरदस्त कामगिरी करीत टीकाकारांना उत्तर द्यावे लागेल. यष्ट्यांमागे व फलंदाजीतील कमजोर कामगिरीमुळे पंतकडे निवड समितीचे बारीक लक्ष असेल. त्याच्याकडे महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जातेय. परंतु विश्वचषक स्पर्धेनंतर गेल्या वर्षभरात त्याची कामगिरी सुमार झालेली आहे. त्याने स्वतःहून फेकलेल्या विकेटमुळे त्याच्यावर टीका होत आहे. त्याच्या जागी वृद्धिमान साहाने वन-डेत आपली जागा निश्चित केली आहे. तसेच युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचीही या मालिकेसाठी निवड झालेली असल्याने पंतसाठी ती एक धोक्याची घंटाही असेल.
भारतासाठी जमेची बाजू असेल ती म्हणजे नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तो तिसर्या स्थानी फलंदाजीस येणार आहे. तसेच चौथ्या स्थानी श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. गोलंदाजीच्या विभागात कुलदीप पवार, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचे पुनरागम निश्चित असेल. शमी आणि भुवनेश्वर यांच्या पुनरामनामुळे भारतीय तेज गोलंदाजी काहीसी प्रबळ बनणार आहे.
‘कुलचा’ म्हणून ओळखले जाणारे कुलदीप आणि चहल बर्याच काळानंतर पुन्हा एकत्र गोलंदाजी करताना दिसणार आहेत. फेब्रुवारीत न्यूझीलंडविरुद्ध कुलदीप छोट्या फॉर्मेटमध्ये शेवटचा खेळला होता. दीपक चहरही शमी आणि भुवनेश्वरच्या साथीत मोठी भूमिका निभावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, विंडीजचा संघ आपल्या मायभूमीत स्वीकाराव्या लागलेल्या ०-३ पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. टी-२०मध्ये विंडीजचा संघ हा एक सर्वोत्कृष्ट संघ मानाला जातो. त्यांनी भारतात येऊन लखनौमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळून येथील वातावरणाशी जुळवून घेतलेले आहे. विस्फोटक फलंदाज तथा अष्टपैलू खेळाडू कीरॉन पोलार्डकडे विंडीजच्या नेतृत्वाची धुरा आहे. त्याला येथील खेळपट्ट्यांची बरीच माहिती असेल. निकोलास पूरनवर चेंडू कुडतरल्याचा आरोप असल्याने चार सामन्यांची बंदी आहे. त्यामुळे शाइ होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी असेल. रॉस्टन चेसकडेही चेंडू आणि बॅटमधून योगदान देण्याची क्षमता आहेे. टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन विंडीजने ब्रँडन किंग, खॅरी पियरे, शेर्फेन रदरफोर्ड, केस्रिक विल्यम्स आणि हेडन वॉल्श ज्युनियरसारख्या युवा खेळाडूंना संघात स्थान दिलेले आहे. त्यांच्या साथीला अनुभवी कार्लोस बॅ्रथवेट, आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्होसारख्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. आम्ही भारतात बरेच क्रिकेट खेळलेलो आहोत आणि त्या अनुभवाचा फायदा आम्ही या मालिकेत सामने जिंकण्यासाठी प्रयत्न करू, असे कर्णधार पोलार्डने स्पष्ट केलेले आहे.
संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीज ः कीरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलेन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कोटरेल, एव्हिन लुईस, शेरफन रदरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पियरे, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्यूनियर, कीमो पॉल, केस्रिक विल्यम्स.