विशाखपट्टणम
भारत व विंडीज यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळविला जाणार आहे. या मैदानावर नाणेफेकीचा कौल विजेता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून झालेल्या सातही सामन्यात नाणेफेक जिंकलेला संघच सामन्याचा विजेता ठरला आहे.
गुवाहाटी येथील पाटा खेळपट्टीवर विंडीजला ३२२ धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयश आले होते. शिमरॉन हेटमायरचा अपवाद वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. कायरन पॉवेल, रोव्हमन पॉवेल यांना चांगल्या सुरुवातीचा मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नव्हते. आजच्या सामन्यासाठी विंडीजच्या फलंदाजी विभागात बदल संभवत नसले तरी गोलंदाजीत बदल होऊ शकतात ऑफ ब्रेक गोलंदाज ऍश्ले नर्स किंवा लेगस्पिनर देवेंद्र बिशूच्या जागी डावखुरा संथगती गोलंदाज फाबियन ऍलनला संधी मिळू शकते. ओबेड मॅकॉय या डावखुर्या जलदगती गोलंदाजाला खेळविण्याचा पर्यायही त्यांच्याकडे आहे.
तीन स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळविण्याचा पर्याय भारताला पहिल्या सामन्यात मारक ठरला होता. मोहम्मद शमी व उमेश यादवने दीर्घ कालावधीनंतर वनडे सामना खेळला आहे. नवोदित खलील अहमदच्या नावावर देखील मोजकेच सामने आहेत. त्यामुळे कुलदीपला संघात घेण्यासाठी फिरकी गोलंदाजाचा बळी दिला जाऊ शकतो.
फलंदाजीत विराट कोहलीच्या नावावर २०४ डावांत ९११९ धावांची नोंद आहे. दहा हजारी होण्यासाठी त्याला केवळ ८१ धावांची आवश्यकता होती. हा पल्ला गाठण्यासाठी सचिन तेंडुलकरला २५९ डाव लागले होते. दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी केवळ एका षटकाराची आवश्यकता आहे. भारताकडून महेंद्रसिंग धोनी (२१७) याने सर्वाधिक षटकार ठोकले आहे. आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले जाऊ शकतात.
सामन्याची वेळ ः दुपारी १.३०
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, युजवेंद्र चहल व खलील अहमद.
विंडीज (संभाव्य) ः चंद्रपॉल हेमराज, कायरन पॉवेल, शेय होप, शिमरॉन हेटमायर, मार्लन सॅम्युअल्स, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, ऍश्ले नर्स, ओशेन थॉमस, देवेंद्र बिशू व किमार रोच.