– साईली उदय नाईक (शिरोडा-फोंडा)
‘‘इथला तरुण स्थिर बुद्धीचा पूर्णपणे प्रामाणिक रहावा. त्याने आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवावी, त्याची वृत्ती निष्कपट असावी. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारही दिशांना त्याचे विचार पसरावेत. सतत कार्यमग्न असावे. नेतृत्व करीत असतानाही सेवक बनावे. निःस्वार्थी राहून अनंत धीर धरावा. नेहमी सावध राहून सत्याची कास धरावी. केवळ आपल्यावरच सार्या कार्याची मदार आहे… अशा भावनेने त्याने काम करावे. कारण भारताचे भवितव्य केवळ अशाच युवकांवर अवलंबून आहे’’.
‘‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’’- अर्थात स्वमाता आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ असते. मग अशा या माझ्या पूण्यपावन भारतभूचा जयघोष करताना मला लाज का वाटावी? या देशात आपल्या सर्वांचा जन्म झाला हेच आपलं सर्वांचं अहोभाग्य! आपली माता आपल्याला जन्म देते… आपलं लालन पालन करते… आपल्याला वाढवते.. अशा मातेला आपण विसरलो तर आपण कृतघ्न ठरू, अशा मातेची थोरवी गाताना जर लाज वाटत असेल तर कपाळकरंटे ठरू… जशी आपली माता तशीच आपली जन्मभूमी. ज्या भूमीत आपला जन्म होतो, ज्या भूमीच्या अंगा-खांद्यावर आपण खेळतो, ज्या भूमीमधील अन्न-पाण्यावर आपण जगतो अशा भूमीला वंदन करताना ज्यांना लाज वाटते ते नामर्द ठरावेत.
हा आपला भारत देश केवळ दगडा-धोंड्यांनी, माती-धुळीने भरलेली निर्जीव भूमी नव्हे… तर सुजलाम्-सुफलाम् अशी पवित्र भूमी जिला आपण भारतमाता म्हणतो. मातेच्या सजीव रूपात तिला पाहतो. दैवत्व प्राप्त झालेली अशी ही भूमी म्हणजे आपली भारतमाता होय. तिचा गौरव करणं, तिचा जयघोष करणं आपलं आद्य कर्तव्य होय.
जगाच्या पाठीवर अशी भूमी क्वचितच असेल जेथे एखाद्या संस्कृतीचा जन्म व्हावा व कैक वर्षे तिची वाढ होताना दिसून यावी. कुणावर कधी बळजबरी नाही की कुणावर ती लादावी लागत नाही. जगाच्या पाठीवर असलेली एकमेव अशी ही भारतभूमी जेथे अनेक धर्मांचा जन्म झाला व त्यांची वाढ झाली. बाहेरून आलेल्या असंख्य धर्मांचंही इथे जतन झालं व त्यांनाही या भूमीनं आपल्या कवेत घेतलं.
हा माझा… तो परका…. हा भेदाभेद येथे त्याज्य ठरला. मग अशा या भूमीला माता का संबोधू नये? किंबहुना इथल्या मातीचा स्पर्श आपल्या कपाळाला करावा व उच्चरवानं म्हणावं- ‘‘भारत माता की जय… भारत माता की जय..’’.
कुण्या कवीने म्हटलंय – ‘‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र – सूर्य – तारे…’’
या भारतमातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. हिच्या उपकारातून उतराई होणं कठीणच होय. खरीच जर तिची आरती करायची असेल तर चंद्र व सूर्याची निरांजने करावी लागतील. तेव्हाच कुठे ते साध्य होईल. या सुजलाम् – सुफलाम् भूमीचं आकर्षण परकियांनाही होतं. अनेकांनी या भूमीला गुलामगिरीनं जखडलं पण या भारतभूची कूस अशी पवित्र की जिनं अनेक शूर वीरांना जन्म दिला. त्या शूर वीरांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता या भूमीला मातेच्या रूपात पाहिलं व तिला बंधनमुक्त करण्यासाठी उच्चरवानं भारत मातेच्या जयघोषाने फाशीलाही कवटाळलं, निधड्या छातीने लढता.. लढता.. वीरमरणही पत्करलं. ‘‘भारत माता की जय’’ म्हणत म्हणत फासावर चढणारे तरुण वीर भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आठवा. भारत माता की जय म्हणणार्या निधड्या छातीच्या व अहिंसेचा मंत्र जपणार्या भारतरत्न खान अब्दूल गफार खानना आठवा. भारतमाता की जयचा उद्घोष करणार्या मौलाना अबुल कलाम आझाद यांना आठवा. नेताजींना आठवा आणि पहा…. ‘भारतमाता की जय’ या मंत्राची व्याप्ती धर्म, जात, पंथ या सार्यांना भेदून कशी भारतीयांच्या मनात भरली होती! निस्सीम देशभक्त होते ते. म्हणूनच त्यांना ‘भारत माता की जय’ मधील शक्ती उमगली. त्यांना ती भावली व त्या शक्तीतून त्यांनी प्रेरणा घेत गुलामगिरीच्या श्रुंखलांना तटातटा तोडून टाकलं. आणि आज ‘भारत माता की जय’ म्हणताना लाज वाटते? अशा नेभळटांचा जन्म या भूमीत व्हावा ही देशाला लागलेली काळीमाच होय. हा कलंक जर पुसला तर हा देश म्हणजे नररत्नांची खाणच जणू.!!
‘भारत माता की जय’चा उद्घोष करताना मन भरून येतं. शरीरावर रोमांच उभे राहतात. या भूमीचं गौरवगान गाताना मन कृतकृत्य होतं. या भूमीत जन्म झाला हेच मोठं भाग्य. हेच मोठं पूण्य होय. ‘भारतमाता की जय’ हा नारा देताना असंख्य कंठांनी मी साद घालीन, असंख्य जिव्हांना मी मंत्र शिकवीन, वेदमंत्राहूनही तो श्रेष्ठ असेल. जे नरवीर असतील, ज्या रणरागिणी असतील, जे निस्सीम देशप्रेमी असतील तेच केवळ तेच एकमुखानं म्हणतील – ‘‘भारत माता की जय!’’ म्हणा- ‘‘भारत माता की जय’’. पुन्हा एकवार जोराने म्हणा- ‘‘भारत माता की जय!’’
विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत
निर्भयतेची कास धरा, भय व दुबळेपणा टाका, सिंहपुरुष व्हा, ज्ञानी व्हा, कर्तव्यप्रचुर व्हा, निर्भीड व संघटित होऊन देशसेवा करा. शेतकर्यांच्या झोपडीतून नवी भारतवर्ष उभा होऊ द्या. कोळ्यांच्या, चांभारांच्या, भंग्यांच्या झोपड्यांतून नवा भारतवर्ष उभा होऊ द्या. किराणामालाच्या दुकानातून आणि भरडभुंजांच्या भट्टीजवळून तो वर येऊ द्या. कारखान्यांमधून, दुकानांतून आणि बाजारातून तो वर येऊ द्या. झाडाझुडपांतून, रानावनांतून, दर्याखोर्यातून, पहाडा-पर्वतांतून तो प्रकट होऊ द्या… अशा क्रांतदर्शी विचारांची समाजमनामध्ये पेरणी करत नवयुवक-युवतींच्या मनाला साद घालत संपूर्ण भारत भ्रमंतीसह विश्वाला गवसणी घालणार्या एका योद्धा संन्याशाने भारतवर्षासाठी एक गोमटे स्वप्न पाहिले. आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी स्वजीवनाचा अखंड धगधगणारा यज्ञ केला. कोण होता तो असीम योद्धा? कोण होता तो कर्मयोगी? प्राचीन भारताच्या वेदान्तधर्माची आधुनिक जगताला ओळख पटवून देणारा… दरिद्री नारायणाची अखंड सेवा करत ईश्वरप्राप्तीचा ध्यास घेतलेला कर्मयोद्धा स्वामी विवेकानंद!
अंधविश्वासाने बरबटलेला, मागासलेला व मूर्तीपूजकांचा देश म्हणजे भारत- ही भारताची जगासमोर झालेली प्रतिमा पुसून भारत म्हणजे जगाचं प्रेरणास्थान, धर्माची शिकवण देणारी व अनादी काळापासून अगदी वर्तमानकाळापर्यंत मानवजातीसमोर सर्वोच्च आदर्श ठेवणारी भूमी आहे हे जगाला आत्मविश्वासानं ठणकावून सांगणार्या स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत म्हणजे केवळ देश नसून पूण्यभूमीच होय. या पुण्यभूमीला जगद्वंद्य बनविणाच्या ध्येयाने झपाटलेल्या स्वामीजींनी जाणले होते. श्रद्धा… केवळ स्वतःवरील श्रद्धा! ईश्वरावरील श्रद्धाच महान बनण्याचे रहस्य आहे. यास्तव इथल्या समाजजीवनाला संबोधन करताना स्वामीजीं म्हणत- ‘‘पुराणांमधून वर्णिलेल्या तेहत्तीस कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, तसेच परकियांनी तुमच्यात वेळोवेळी प्रस्तृत केलेल्या सर्व देवतांवरही तुमची श्रद्धा असेल.. पण तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणे शक्य नाही. यास्तव स्वामीजींच्या स्वप्नातील भारतात स्वामीजींना वाटे- असे लोक जन्माला यावेत ज्यांची स्वतःवर श्रद्धा असेल, जे निर्भय असतील, जे स्वतःला तेजस्वी मानतील!
स्वामीजींना दुबळ्या, गरीब, लाचार मानसिकतेच्या लोकांची कीव येई. त्यांना सक्षम बनवावं, त्यांच्यात क्षात्र तेज उत्पन्न व्हावं, समाजमन निकोप व्हावं व राष्ट्रधर्म वाढीस लागावा. एक समर्थ संपन्न असं राष्ट्र बनावं असं त्यांना वाटे. इथल्या समाजमनाचा स्फुल्लिंग चेतविताना स्वामीजी उच्चरवाने म्हणत- ‘‘ईश्वराचे पुत्र तुम्ही. तुम्ही अमृताचे अधिकारी. पवित्र, पूर्ण तुम्ही या मर्त्यभूमीतील देवता. तुम्ही अन् पापी?? अशक्य! मानवाला पापी म्हणणेच महापाप. विशुद्ध मानवात्म्यांवर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे.
बंधूंनो.., तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा, मृगराजांनो उठा… आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्मा आहात.’’
स्वामींच्या स्वप्नातील भारतात स्वामीजींना वाटे सर्वसामान्य जनतेची उपेक्षा म्हणजे घोर राष्ट्रीय पाप होय! यास्तव या देशात दरिद्रीनारायणाची सेवा घडावी – नरसेवा हीच ईश्वर सेवा व्हावी. जातिबंधनाच्या श्रुंखला तुटाव्यात व आपण सारे मानवप्राणी एकाच ईश्वराची लेकरे असून समस्त मानवजातीच्या सहकार्याने राष्ट्राचा उद्धार व्हावा. स्वप्नातील भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया मजबूत असावा. आधी स्त्रियांचा उद्धार व्हावा, सर्वसामान्य जनतेत स्त्रीशिक्षणाविषयी जागृती व्हावी, तरंच आपल्या भारतवर्षाचे कल्याण होईल. स्त्रिया म्हणजे साक्षात जगदंबेच्या प्रतिमाच आहेत. यास्तव त्यांचा योग्य सन्मान या देशात व्हावा व इथला समाज उन्नतावस्थेत पोहचावा. इथल्या स्त्रिया सुशिक्षित व्हाव्यात, त्यांना त्यांचे कार्य करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, त्यांना हव्या असलेल्या सुधारणा घडाव्यात, स्वतःच्या समस्या स्वतःच्या पद्धतीने स्वतःच सोडविण्याची क्षमता त्यांना लाभावी. त्या शिकतील तरच मुलाबाळांकरवी देशाचे मुख उज्ज्वल होईल. हे राष्ट्र संपन्न होईल. ज्ञान, शक्ती, भक्ती वगैरेंची जागृती होईल. हे राष्ट्र समृद्ध होईल.
विवेकानंदांच्या स्वप्नातील भारतात शिक्षण हे समाजाच्या उन्नतीचा केंद्रबिंदू ठरावे. शिक्षण हे चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असावे व अशा शिक्षणाचा भक्कम पाया या राष्ट्रात रचला जावा.
स्वामीजींना वाटे- भविष्यातील भारतीय नवयुवकांचे मज्जातंतू शक्तिसंपन्न व्हावेत. इथला तरुण स्थिर बुद्धीचा पूर्णपणे प्रामाणिक रहावा. त्याने आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवावी, त्याची वृत्ती निष्कपट असावी. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारही दिशांना त्याचे विचार पसरावेत. सतत कार्यमग्न असावे. नेतृत्व करीत असतानाही सेवक बनावे. निःस्वार्थी राहून अनंत धीर धरावा. नेहमी सावध राहून सत्याची कास धरावी. केवळ आपल्यावरच सार्या कार्याची मदार आहे… अशा भावनेने त्याने काम करावे. कारण भारताचे भवितव्य केवळ अशाच युवकांवर अवलंबून आहे. यास्तव स्वामीजींनी आपल्या स्वप्नातील भारतात अशाच युवकांचा ध्यास घेतला होता.
स्वामीजींनी तरुणांना हाक देताना म्हटले होते- ‘‘माणसे हवी आहेत… माणसे हवी आहेत. इतर सर्व काही आपोआप जुळून येईल. परंतु सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट अशी तरुण माणसे हवी आहेत. असे शंभर तरुण मिळाले तरी सर्व जगात क्रांति घडविता येईल. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावे लागेल. काही आकार द्यावा लागेल. मगच त्यांच्याकडून खर्या खर्या कार्याची अपेक्षा करणे उचित ठरेल. स्वामीजी आपल्या स्वप्नातील युवकांना संदेश देताना म्हणत… ‘‘पुढे चला… सतत पुढे चला! अगदी अखेरपर्यंत गरीब व दलित यांच्याविषयी सहानुभुती बाळगा. हाच आपला मूलमंत्र असू द्या. ईश्वरावर विश्वास असू द्या. दुःखितांसाठी तुमचे हृदय कळवळू द्या आणि साहाय्यासाठी भगवंताची प्रार्थना करा, तुम्हाला सहाय्य मिळेलच! मी तुमच्यासाठी गरीब, अज्ञानी आणि दलित यांच्याविषयीच्या सहानुभुतीचा आणि उन्नतीसाठी प्राण पणाला लावून प्रयत्न करण्याचा वारसा ठेवून जात आहे. त्यांचा उद्धार करण्यासाठी आपले सारे जीवन अर्पण करण्याची तुम्ही प्रतिज्ञा करा. तुम्ही सिंहासारखे व्हा. सार्या भारताला व समस्त जगताला जागृत करा. माझ्या स्वप्नातील भारतातील युवकांनो, … हे भारतवासियांनो… उठा, स्वतः जागे व्हा व इतरांना जागे करा. नरजन्माचे सार्थक करा… ‘‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्यवरान्निबोधत!!’’