भारत भाग्यविधाता

0
172

स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज १२५ वी जयंती. कोणाला मान्य होवो अथव न होवो, परंतु पंडित नेहरू यांचे या देशाच्या जडणघडणीमधील योगदान अमूल्य असेच आहे. स्वतंत्र भारताच्या आज जगामध्ये उन्नत असलेल्या इमारतीचा बळकट पाया नेहरूंच्या दूरदृष्टीवर बेतलेला आहे याचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा ठरेल. खरे तर बाल जवाहरची जडणघडण आधुनिक विचारसरणीनुसार झाली. शिक्षणही हॅरो स्कूलसारख्या इंग्रजी शाळेत आणि उच्च शिक्षण केंब्रीजमध्ये झाले. परंतु तरीही या देशाच्या आत्म्याची ओळख नेहरूंना पुरेपूर पटली होती आणि ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ सारख्या त्यांच्या अनमोल ग्रंथामध्ये या देशाचा हा आत्माच प्रकटलेला आहे. त्यामुळे जेव्हा ब्रिटिशांनी स्वतंत्र भारताची कमान त्यांच्या हाती सोपवली, तेव्हा या आपल्या शतकानुशतकांची परंपरा असलेल्या देशाची पुनर्उभारणी ही लोकशाहीवादी, सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष तत्त्वांवर व्हायला हवी याची खूणगाठ नेहरूंनी बाळगली आणि अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद यांच्या खाईत खितपत पडलेल्या भारताला एक नवी दिशा देत नव्या विकासमार्गावर आणून ठेवले. ४७ सालचा भारत कसा असेल याची आजच्या परिस्थितीतही नित्य अनुभवास येणार्‍या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण कल्पना करू शकतो. अशा विराट समाजाला नेतृत्व देणे सोपे नव्हते आणि गांधीजींच्या आशिर्वादाबरोबरच वैयक्तिक करिष्मा असल्याशिवाय त्यांचे नेतृत्व मूळ धरू शकले नसते आणि सर्वमान्यही ठरू शकले नसते. नेहरूंच्या रूपात गांधीजींनी देशाचे भविष्य पाहिले आणि त्यांच्या हाती स्वतंत्र भारताचे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता आहे याबाबत ते निश्‍चिंत राहिलेे. हा विश्वास पंडितजींनी वाया जाऊ दिला नाही. या स्वतंत्र देशाच्या उभारणीसाठी त्यांनी जे चौफेर प्रयत्न केले, त्यांचे सिंहावलोकन जरी केले, तरीही त्यांच्या कार्याची महत्ता पटल्याखेरीज राहणार नाही. या देशाची वाटचाल लोकशाही तत्त्वांवर व्हावी, त्याचेे विविधतेतून एकता हे सूत्र असावे, धर्मनिरपेक्ष समाज हे त्याचे मूलतत्त्व असावे हा विचार नेहरूंनी या देशाला दिला. संसदीय कार्यपद्धती, बहुपक्षीय राजकीय व्यवस्था, स्वतंत्र व स्वायत्त न्यायपालिका, मुक्त माध्यमे आदींच्या आधारे या भारतभूमीमध्ये लोकशाहीची बीजे खोपवर रुजवण्यात पं. नेहरूंचे योगदान निव्वळ अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले आणि त्या संविधानाच्या छायेत देशाला प्रगतिपथावर नेण्याचे कार्य नेहरूंनी केले. बडे बडे उद्योगपती तेव्हाही देशात होते. परंतु मूलभूत उद्योगांमध्ये सरकारने आपले पाय रोवले पाहिजेत हे नेहरूंनी हेरले आणि पोलाद, लोह, कोळसा, ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची उभारणी केली. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र या दोहोंचे सहअस्तित्वच हा देश पुढे नेईल याची त्यांना खात्री होती. औद्योगिक विकासाचे महत्त्व नेहरूंनी जाणले होते आणि अगदी सुरूवातीपासूनच देशाच्या औद्योगिकीकरणाची कास धरली होती. नियोजनबद्ध विकासावर नेहरूंनी सतत भर दिला. नियोजन आयोगाच्या माध्यमातून देशाच्या विकासाच्या आराखड्याला मूर्तरूप देणे असो, भाक्रा – नानगल धरणासारख्या मूलभूत साधनसुविधांची केलेली उभारणी असो, विज्ञान – तंत्रज्ञानाची सतत धरलेली कास असो, नेहरूंच्या द्रष्टेपणाचे असे अनेक दाखले इतिहासात मिळतात. या देशाच्या युवावर्गाला विज्ञान – तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळायला हवी यासाठी नेहरू आग्रही होते. त्यातूनच आयआयटी, एनआयटीसारख्या संस्था, वैद्यकीय शिक्षणाची ‘एम्स’ सारखी संस्था, राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळा उभ्या राहिल्या आणि त्यांनी लक्षावधी तरुणांना नव्या क्षितिजांची आस लावली. शेतीमध्ये शेतकर्‍यांनी प्रगती करावी यासाठी भात, गहू यांच्या सुधारित जातींवर संशोधनास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यासाठी कृषी विद्यापीठांची उभारणी केली. भूसुधारणा घडवून आणल्या, जमीनदारीचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला. नेहरूंची प्रगल्भ विदेश नीती हा त्यांच्या जीवनकर्तृत्वातील एक झळाळता अध्याय आहे. शीतयुद्धाच्या जंजाळात न अडकता भारताचे शांततापूर्ण सहअस्तित्व राखण्याची नीती नेहरूंनी स्वीकारली. त्यांच्या विश्वासाला चीनसारख्यांनी तडा दिला हा भाग वेगळा. नेहरूंच्या हातूनही काही चुका घडल्या. परंतु म्हणून त्यांचे भारताच्या जडणघडणीतील योगदानच नाकारणे हा कृतघ्नपणा ठरेल.