>> सीआयआयला १२५ वर्षे पूर्ण
भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणार्यांवर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे भारत निश्चित पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
कोरोनामुळे विकासाचा वेग जरी कमी झालेला असला तरी भारताने लॉकडाऊन मागे सारत अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरू झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल असे पंतप्रधान म्हणाले.
जगात कोरोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली. लॉकडाऊनच्या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील. कोरोनाविरोधात लढताना अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली असून दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्ंगत ५३ हजार कोटींची आर्थिक मदत दिली आहे. सुधारणांसंबंधींचे निर्णय घेताना एक निश्चित विचार केल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात आता उत्पादनांची निर्मिती करण्याची गरज आहे. उत्पादन मेड इन इंडिया असले तरी ते मेड फॉर वर्ल्ड असले पाहिजे असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.