>> पंतप्रधान इम्रान खानकडूनही आरोपाचा पुनरुच्चार
पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमागे भारतच असल्याचा आरोप पाकचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केला होता, त्याचा पुनरुच्चार पंतप्रधान इम्रान खान यांनीही केला आहे. पाकिस्तानपाशी याचे सबळ पुरावे असल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ पैसे पुरवित असून त्यासंबंधीच्या बँक व्यवहाराचा तपशील, पत्रे, संभाषणाचे पुरावे पाकिस्तानला मिळाले असल्याचा दावा शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला होता. भारताकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तान भारताविरुद्धचे हे पुरावे संयुक्त राष्ट्र, इस्लामी देशांची संघटना आदी आंतरराष्ट्रीय संस्थांकडे सुपूर्द करणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी संघटना घोषित केलेली जमातुल अहरार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी व तेहरीक इ तालिबान पाकिस्तान या संघटनांना भारत पाठबळ व शस्त्रास्त्रे देत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीतील ‘रॉ’ चे अधिकारी दहशतवाद्यांशी संधान साधून असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून यासंदर्भात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान अफगाणिस्तान भेटीवर जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट नियंत्रणाखाली एक विशेष विभाग स्थापन करण्यात आला असून पाकिस्तानातील दहशतवादी गटांना त्याद्वारे २२ अब्ज रुपये वाटण्यात आले आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. चीन – पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारताच्या दहा गुप्तचर अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानात सातशे दहशतवाद्यांचा गट सक्रिय झाला असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. तेहरिक इ तालिबान पाकिस्तान व बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी भारताने संधान बांधले असून बीएलए, बीएलएफ व बीआरए या तीन बलुची दहशतवादी संघटनांचे एकत्रीकरण करण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था कार्यरत आहेत असा आरोपही केला आहे.
अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासातील कर्नल राजेश यांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांसमवेत चार बैठका घेतल्या, दोघा भारतीय अधिकार्यांनी ३० दहशतवाद्यांना पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमेवरून पाकिस्तानात घुसविले व शेख अब्दुल रहीम या दहशतवादी म्होरक्याकडे सुपूर्द केले असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. भारतातून पैसे व शस्त्रे पुरविल्याचे पुरावे असल्याचे पाकचे म्हणणे आहे.