भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून गहुंजे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून दुसर्या सामन्यासह मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारणे संघाला शक्य झाले होते. पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसर्या कसोटीतही नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारताच्या फलंदाजांचा विशेषकरून सलामीवीरांचा फॉर्म पाहता पाहुण्यांना आपली गोलंदाजी प्रभावी करावी लागणार आहे. यासाठी पहिल्या सामन्यात निष्प्रभ ठरलेला ऑफस्पिनर डॅन पिद याच्या जागी दक्षिण आफ्रिका वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला उतरवू शकते. आपल्या शुभारंभी कसोटीच्या दोन्ही डावांत नाबाद राहून चिवट फलंदाजी केलेल्या सेनुरन मुथूसामी याला वगळून झुबेर हमझा याला खेळविण्याचा पर्यायही आहे. परंतु, ही शक्यता खूप कमी वाटते. मुथूसामीला वगळल्यास केशव महाराजच्या रुपात एकमेव फिरकीपटू संघात राहील.
खेळपट्टी तिसर्या व चौथ्या दिवशी फिरकीला पोषक होणे अपेक्षित असून केवळ एका फिरकीपटूसह उतरणे त्यांच्या अंगलटदेखील येऊ शकते. भारतासाठी कर्णधार कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. मागील पाच कसोटी सामन्यात केवळ ३६.५०च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील दोन, विंडीजमधील दोन व भारतातील एक अशा मागील पाच सामन्यांत त्याला शतकी वेस ओलांडता आलेली नाही. कोहलीचा दर्जा पाहता आजपासून सुरू होणार्या दुसर्या कसोटीत त्याच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. ऐनवेळी दुखापत झाली तरच भारतीय संघात बदल संभवतो अन्यथा पहिल्या सामन्यात खेळलेला संघच दुसर्या सामन्यात खेळविण्याचे संकेत विराट कोहली याने दिले आहेत. मागील वेळी (२०१७) भारताला पुणे येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३३ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. स्टीव ओकिफने सामन्यात १२ बळी घेत सामना गाजवला होता. केवळ तीन दिवसांत सामन्याचा निकाल लागल्याने क्युरेटर साळगावकर टीकेचे धनी ठरले होते. आयसीसीकडूनदेखील खेळपट्टीबाबत शेरा मारण्यात आला होता. त्यामुळे सामन्यापेक्षा खेळपट्टीमुळे गाजलेल्या ‘पुणे’ कसोटीची पुनरावृत्ती आजपासूनच्या कसोटीत अपेक्षित नाही.