>> समारोपावेळी राहुल गांधींनी सांगितला यात्रेचा सार; बर्फवृष्टीतच भाषण; भाजपवर टीकास्त्र
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काल श्रीनगर येथे समारोप झाला. काल सकाळपासूनच काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत होती, त्याच बर्फवृष्टीत भाषण करत राहुल गांधींनी यात्रेचा समारोप केला. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगितला. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा असून प्रेम, बंधुभाव वाढावा यासाठी भारत जोडो यात्रेने प्रयत्न केले असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी राहुल गांधींनी काश्मिरच्या लोकांच्या भावनेला हात घालत आपली आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर आपल्या मनावर काय परिणाम झाला, याची थोडक्यात माहिती दिली. आज ज्यांच्या घरातले सैनिक शहीद होतात, काश्मिरमधील लोक जेव्हा स्वतःच्या घरातले जवळचे लोक गमावतात, तेव्हा त्यांची मनस्थिती काय होत असेल, हे मी आणि माझी बहीण चांगल्या रितीने समजू शकतो, कारण आम्ही दोघे त्या परिस्थितीतून गेलो असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
मी 14 वर्षांचा होतो आणि शाळेत भूगोलाचा तास सुरू होतो, तेव्हा माझे एक शिक्षक जवळ आले आणि म्हणाले की तुम्हाला मुख्याध्यापकांनी बोलावले आहे. मी मुख्याध्यापकांकडे पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितले की, घरून फोन आला आहे. मी फोन घेतला आणि फोनवर बोललो तेव्हा माझ्या आईसोबत काम करणारी बाई जोरात ओरडली, ‘राहुल… आजीला गोळी लागली आहे’ या प्रसंगाचे वर्णन करताना राहुल गांधी भावूक झाले.
आपल्या देशातील सैनिकांच्या पालकांना अनेकदा एक फोन येतो. हजारो काश्मिरी लोकांना एक फोन आला असेल. तसाच एक फोन मला आला. माझ्या वडिलांच्या एका मित्राने मला फोन केला. ते म्हणाले, राहुल एक वाईट बातमी आहे. पप्पांचे निधन झाले. आता हे जे मी सांगतोय, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अजित डोवाल यांना समजणार नाही; पण ही गोष्ट काश्मिरच्या लोकांना समजेल. सीआरपीएफ, आर्मीच्या जवानांनाही ही गोष्ट समजेल, असे राहुल गांधी म्हणाले. हे जो फोन येतात आणि आपला जवळचा व्यक्ती गेल्याचे सांगतात, ते पूर्णपणे बंद व्हावेत, असे माझे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.