पाच दिवसांच्या दौर्यावर मोदी जपानमध्ये
भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल येथे जपानबरोबर पहिला करार केला. प्राचीन वाराणसी नगरीला क्योटो प्रमाणे विकसित करण्याविषयीच्या या महत्वाकांक्षी करारावर काल मोदी व जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्या झाल्या.
मोदी लोकसभेत वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. वरील करारावर भारतातर्फे जपानमधील भारताचे राजदूत दिपा वाधवा व कयोटोचे महापौर डाईसाका कडोकावा यांनी स्वाक्षर्या केल्या. मोदी यांचे जपानमध्ये आगमन झाल्या दिवशीच हा करार झाला. आपल्या पाच दिवसीय जपान दौर्यात मोदी वारसा संवर्धन, शहर आधुनिकीकरण तसेच कला-संस्कृती, शैक्षणिक या संदर्भात जपानशी सहकार्य मागणार आहेत. अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली. क्योटो हे वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेले शहर असून तेथे बौध्द संस्कृतीही आहे. भारतीय शहरांचा विकास करण्याचे उद्दिष्ट मोदी यांनी ठेवले असल्याने त्यांच्या जपान दौर्याला विशेष महत्व आहे. वरील करारात सहकार्यासाठी तपशीलवार योजना तयार करण्यात आली आहे. उभय शहरांमध्ये त्या अनुषंगाने देवाणघेवाणही अपेक्षित आहे.
वरील करारावर स्वाक्षर्या झाल्यानंतर आबे यांनी मोदी यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन केले. त्याआधी मोदी यांचे ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.