भारत आणि कॅनडामधील तणाव जवळपास वर्षभरापासून वाढलेला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने काही महिन्यांपूर्वी केला होता, तर भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. आता कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. भारताने कॅनडाचा हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून हे ट्रूडो यांचा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, रविवारी कॅनडातून एक राजकीय संदेश प्राप्त झाला, त्यामध्ये कॅनडात उपस्थित भारतीय उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना एका प्रकरणात ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्णन केले आहे. म्हणजेच कॅनडाचे सरकार या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त आणि मुत्सद्दींना संशयित मानत आहे. ते कोणत्या प्रकरणात संशयित आहे, हे सांगण्यात आले नसले तरी हे संपूर्ण प्रकरण दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.
कॅनडाच्या उच्चायुक्तांना भारत सोडण्याचे आदेश
यानंतर आता भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय भारताने कॅनडातील उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले आहे.