>> टीम इंडियासमोर संघ निवडीचा पेच
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मंगळवारी मुंबई येथे खेळविला जाणार आहे. कसोटी क्रिकेट गाजवलेला ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनचे संभाव्य वनडे पदार्पण व भारतासमोर असलेला सलामीचा पेच यामुळे या मालिकेचा शुभारंभी सामना गाजण्याची शक्यता आहे.
तुलनेने कमकुवत श्रीलंकेविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका गाजवल्यानंतर तुल्यबळ ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताला सोपी जाणार नाही. जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स हे त्रिकुट ‘वनडे’साठी एकत्र आल्याने भारतीय फलंदाजांना फटक्यांची निवड करतानाची एखादी चूक महागात पडू शकते. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फळीदेखील भारतापेक्षा अधिक खोल असल्यामुळे भारतीय गोलंदाजाच्या जबाबदारीत वाढ होणार हे नक्की. भारतीय संघाचा विचार केल्यास मधली फळी अजूनही सक्षम वाटत नाही. श्रेयस अय्यर, केदार जाधव व रवींद्र जडेजा या त्रिकुटाला फलंदाजीतील आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. जाधवची गोलंदाजी तर हळुहळू लोप पावताना दिसत आहे.
स्पेशलिस्ट फलंदाजाच्या जागेसाठी जाधवपेक्षा अन्य कितीतरी खेळाडू रांगेत आहेत. त्यामुळे जाधवला गोलंदाजीची संधी मिळाल्यास त्याचा लाभ उठवावा लागेल. शार्दुल ठाकूरने टी-ट्वेंटी मालिकेत गोलंदाजीसह फलंदाजीने प्रभाव पाडला होता. परंतु, एवढ्यातच त्याला ‘अष्टपैलू’चे बिरुद लावणे धोक्याचे ठरू शकते. परंतु, फलंदाजीतील खोली वाढवण्यासाठी शार्दुलला संघात घ्यायचे ठरविल्यास नवदीप सैनी किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी एकाच्या जागेला धोका निर्माण होऊ शकतो. यष्टिरक्षकाच्या जागेसाठी लोकेश राहुल व ऋषभ पंत यांच्यात चुरस असून दोघांपैकी एकाची निवड संघ व्यवस्थापनाला करावी लागेल. अन्यथा दोघांना खेळविण्याचे झाल्यास धवनला बाहेर बसवावे लागणार आहे.
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी व जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संभाव्य ः डेव्हिड वॉर्नर, ऍरोन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, पीटर हँट्सकोंब, आलेक्स केरी, ऍष्टन एगार, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड व ऍडम झंपा.