भारत उपांत्य फेरीत

0
130
आयसीसी विश्‍व चषक उपउपांत्य लढतीत हिंदीतून समालोचन करताना बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर. बाजूस चार बळी घेतलेल्या उमेश यादवचे अभिनंदन करताना सुरेश रैना व पाठमोरा धोनी

प्रथमच विश्‍व चषक उपउपांत्य फेरीत खेळलेला आशियाई प्रतिस्पर्धी बांगलादेशवर १०९ धावांनी दिमाखदार विजय मिळवत विजेत्या टीम इंडियाने सलग दुसर्‍यांदा आयसीसी विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य ङ्गेरी गाठली. या विजयाने भारताने २००७मधील विश्‍व चषकातील पराभवाचा वचपा काढला.
रोहितचे (१२६ चेंडूत १२७) सातवे ‘वन-डे’ शतक आणि त्याने बहरातील सुरेश रैनाच्या साथीत (६५) चौथ्या यष्टीसाठी १५.५ षटकांत केलेल्या १२२ धावांच्या भागीवर भारताने ६ बाद ३०२ धावांचे तगडे आव्हान खडे केले आणि नंतर गोलंदाजांनी प्रभावी कामगिरीत बांगलादेशचा डाव ४५ षटकांत अवघ्या १९३ धावांवर आटोपला.विजेत्या भारताचा हा आणखी एक सहजसुंदर विजय असून, गेल्या विश्‍व चषकातील चारसह धोनी आणि कंपनीचा हा सलग अकरावा विजय होय. भारताने स्पर्धेंत आतापर्यंत आपले श्रेष्ठत्व प्रस्थापिताना प्रथम फलंदाजी केलेल्या सामन्यांत तीनशे वा त्याहून अधिक धावा तसेच सात सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांचे ७० बळी घेतले आहेत. भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कर्णधार म्हणून जिंकलेला हा १०० वा आणि वर्ल्डकपमधील सलग सातवा विजय ठरला. भारताची गाठ आता दि. २६ रोजी सिडनी येथे होणार्‍या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील तिसरा उपउपांत्य सामना जिंकणार्‍या संघाशी पडेल.

रणबीर कपूरचा ‘मौके पे चौका’
‘महानायक’ अमिताभ बच्चन पाठोपाठ बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनेही काल भारत आणि बांगलादेशमधील आयसीसी विश्‍व चषक उपउपांत्य लढतीत आपली हिंदी समालोचनाची हौस भागविली. कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या शोएब अख्तरला प्रश्‍न विचारण्यापासून ते भारतीय ङ्गलंदाजांनी चांगला ङ्गटका मारल्यानंतर आनंदाने ‘और ये शानदार चौका…’ म्हणण्याचा आनंदही त्याने लुटला. समालोचक म्हणून एखाद्या ङ्गलंदाजाने चौकार मारल्यानंतर ‘और ये शानदार चौका…’ या ओळी बोलता याव्यात, असे मला नेहमी वाटत असे. यानिमित्ताने ती इच्छा पूर्ण झाल्याचे रणबीरने सांगितले.
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीदेखील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्यावेळी समालोचन केले होते. भारतीय संघ यंदा ऑस्ट्रेलियातही विश्वचषक उंचावेल, असा विश्वास रणबीरने यावेळी व्यक्त केला.