>> पापुआ न्यू गिनीचा १० गडी व २५२ चेंडू राखून पराभव
अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत काल मंगळवारी भारताने नवख्या पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाचा १० गडी व २५२ चेंडू राखून पराभव केला. भारताने आपल्या पहिल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १०० धावांनी फडशा पाडला होता. कालच्या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. पीएनजी संघाचा डाव ६४ धावांत गुंडाळून भारताने पृथ्वी शॉ (नाबाद ५७) याच्या जोरावर ८ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. भारताकडून गोलंदाजीत डावखुरा संथगती गोलंदाज अनुकूल रॉय याने ५ गडी बाद केले.
धावफलक
पापुआ न्यू गिनी ः सायमन अटाय धावबाद १३, इगो माहुरू पायचीत गो. मावी ४, हेगी तौआ त्रि. गो. मावी ०, ओविया सॅम झे. मावी गो. रॉय १५, वागी काराहो झे. जुयल गो. अर्शदीप ६, सिनाका अरुआ त्रि. गो. रॉय १२, केवाऊ ताऊ झे. गिल गो. रॉय २, लेके मोरिया त्रि. गो. नागरकोटी ०, जेम्स ताऊ त्रि. गो. रॉय ०, बोगे अरुआ नाबाद ०, सेमो कामिया त्रि. गो. रॉय ०, अवांतर १२, एकूण २१.५ षटकांत सर्वबाद ६४.
गोलंदाजी ः शिवम मावी ५-०-१६-२, कमलेश नागरकोटी ६-३-१७-१, अनुकूल रॉय ६.५-२-१५-५, अर्शदीप सिंग ३-०-१०-१, शिवा सिंग १-०-१-०.
भारत ः पृथ्वी शॉ नाबाद ५७, मनजोत कालरा नाबाद ९, अवांतर १, एकूण ८ षटकांत बिनबाद ६७.
गोलंदाजी ः सेमो कामिया ३-०-२७-०, जेम्स ताऊ ४-०-२८-०, लेके मोरिया १-०-११-०.
पाकिस्तानचा एकतर्फी विजय
पाकिस्तान व आयर्लंड यांच्यात वांघारेई येथे झालेला सामनादेखील एकतर्फी ठरला. आयर्लंडचा डाव ९७ धावांत संपवल्यानंतर पाकने ८.५ षटकांत १ गडी गमावून विजयाला गवसणी घातली. डावखुरा मध्यमगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने पाककडून केवळ १५ धावांत ६ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना मोहम्मद झैद आलम या सलामीवीराने १९ चेंडूंत नाबाद ४३ धावा चोपल्या.