>> इटलीचे भारतातील राजदूत आंतोनियो एनरिको बार्टोली यांची माहिती; गोव्यात आगमन
भारत आणि इटली या दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये भारत आणि इटलीचे पंतप्रधान यांच्यामध्ये एका संयुक्त कृती आराखड्यावर स्वाक्षरी केली जाणार आहे, अशी माहिती इटलीचे भारत आणि नेपाळमधील राजदूत आंतोनियो एनरिको बार्टोली यांनी या प्रतिनिधीशी बोलताना येथे काल दिली.
इटलीचे भारत आणि नेपाळमधील राजदूत आंतोनियो एनरिको बार्टोली यांचे गोव्यात आगमन झाले आहे. इटलीचे परिक्रम जहाज सुध्दा मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आंतोनियो बार्टोली म्हणाले की, भारत आणि इटली या दोन्ही देशामध्ये संरक्षण, वाणिज्य, तंत्रज्ञान, पर्यटन, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात सहकार्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानाच्या होणाऱ्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
इटलीतील नौदलाची जहाजे परिक्रमा करीत आहेत. भारतीय नौदलासोबत सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचे जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. या जहाजामध्ये हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध आहे. त्यात अत्याधुनिक उपकरणे सुध्दा आहेत, असेही बार्टोली यांनी सांगितले.
नवी दिल्लीमध्ये इटलीकडून व्हिसा सेंटर सुरू करण्यात आले असून, या सेंटरला भारतीय नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्याच धर्तीवर आता बंगळुरू येथे व्हिसा सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू आहे. या व्हिसा सेंटरमुळे भारत आणि इटली या दोन देशात मैत्रीपूर्ण संबंध वाढण्यास मदत होईल. व्यापार, सांस्कृतिक याच बरोबर भारतातील अनेक नागरिक इटलीमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या नातेवाईकांना सुध्दा या सेंटरचा व्हिसा घेण्यासाठी लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
इटलीच्या गोव्यातील मानद वाणिज्य दूतावासाचे काम उत्तम आहे. या दूतावासाच्या माध्यमातून गोव्यात उद्योग, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्रात आदानप्रदान केले जात आहे, असेही बार्टोली यांनी सांगितले.
आजपासून संयुक्त कवायतींचे आयोजन : कॅरोलिस्ट
इटली नौदलाकडून शांतता आणि स्थिरतेसाठी प्राधान्य दिले जात आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांशी नौदलाच्या संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली आहे. भारतीय नौदल आणि इटली नौदल यांच्या 5 आणि 6 रोजी संयुक्त कवायतींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इटलीचे व्हाईस ॲडमिरल कमांडर ऑरेलिओ डी कॅरोलिस्ट यांनी मुरगाव बंदरात जहाजावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.