>> मोहम्मद सिराजचे सामन्यात १० बळी
रुडी सेकंड याचा चिवट प्रतिकार मोडून काढत भारत ‘अ’ संघाने चारदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा एक डाव व ३० धावांनी पराभव केला. पहिल्या डावात पाच बळी घेतलेल्या सिराजने दुसर्या डावातही पाच बळी घेत एकूण दहा बळी घेण्याचा पराक्रम केला.
पहिल्या डावात संघ ४ बाद ९३ अशा स्थितीत असताना ९४ धावांची समयोचित खेळी केलेल्या रुडी सेकंड याने दुसर्या डावात संघाची दयनीय स्थिती असताना नांगर टाकताना भारतीय गोलंदाजांना सतावले. त्याने ३२४ मिनिटे खेळपट्टीवर घालवताना २१४ चेंडूत ११ चौकारांसह ९४ धावांची संस्मरणीय खेळी केला. त्याच्या या चिवट झुंजीनंतरही भारताने चिन्नास्वामी स्टेडियमवर काल संपलेला सामना आपल्या नावे केला. तिसर्या दिवशी पाहुण्यांचे शतकापूर्वीच चार गडी बाद केल्यामुळे काल भारत ‘अ’ विजयाची औपचारिकता पूर्ण करेल अशीच चिन्हे होती. परंतु, अंधारलेले आकाश व कमी होत असलेल्या प्रकाशावर मात करत भारताने केवळ ७ चेंडू शिल्लक असताना नाट्यमय विजय प्राप्त केला.
तिसर्या दिवशी ४६ धावांवर नाबाद राहिलेल्या झुबेर हमझा याने सेकंड याला तोलामोलाची साथ देताना १२६ चेंडूंत ६३ धावा जमवल्या. दिवसातील नवव्या षटकात रजनीश गुरबानी याने हमझा याला स्लिपमध्ये हनुमा विहारीकरवी झेलबाद करत भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. सेकंड व शॉन वॉन बर्ग (५० धावा, १७५ चेंडू, १ चौकार) यांनी सहाव्या गड्यासाठी ३०६ चेंडूंत ११९ धावा जोडत सामना अनिर्णिततेकडे नेला. गुरबानीने वॉन बर्गचा काटा काढल्यानंतर चहलच्या एका खाली राहिलेल्या चेंडूवर सेकंड पायचीत झाला. मालुसी सिबोटो याने ६४ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकत ५० चेंडूंत नाबाद ७ धावा करताना संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसर्या टोकाने अक्षर पटेल याने ब्युरन हेंड्रिक्स (१०) व सिराजने दुआने ऑलिव्हर (०) याला बाद करत भारताचा विजय साकार केला. मालिकेतील दुसरा सामना १० ते १३ ऑगस्ट या कालावधीत याच मैदानावर खेळविला जाणार आहे.