
पणजी (क्री. प्र.)
सुनील रमेशच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या पर्वरी येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या दृष्टिहिनांच्या त्रिकोणीय टी-२० मालिकेतील सामन्यात श्रीलंकेवर १ गडी राखून रोमहर्षक विजय मिळविला.
श्रीलंकन संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय संघाने ५ गडी गमावत १९२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सुनील रमेशने ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अजय रेड्डीने नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. जी. मधुकरने ३१, पी. जयरामैयाने २७ तर डी. मलिकने ११ धावा जोडल्या. लंकेतर्फे समान तुशाराने ३० धावांत २, तर डी. रविंद्र, पथुम समान कुमारा यांनी प्रत्येकी १ बळी मिळविले.
प्रत्युत्तरात विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली होती. परंतु भारतीय खेळाडूंनी विशेषतः क्षेत्ररक्षकांनी श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना धावचीत करून आव्हान कायम राखले. श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिली आणि श्रीलंकेला विजयाच्या जवळ आणले. परंतु अंतिम ३ चेंडूंमध्ये श्रीलंकेला फक्त २ धावा हव्या असताना भारतीय कर्णधार अजय रेड्डीने उत्कृष्ट गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले आणि भारताला हा अटीतटीचा सामना जिंकून दिला. श्रीलंकेला ९ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावांपर्यंत मजल मारता आली. लंकेतर्फे प्रियंता कुमारने ४३, पथुम समान कुमारने ३६, डी. मथुंगामने ३५ तर के. कुमाराने १० धावा जोडल्या. भारतातर्फे सुनील रमेश, दीपक मलिक, डी. राव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
विजयामुळे अंतिम सान्यातील आपले स्थान निश्चित केले. हा सामना १३ ऑक्टोबर रोजी पर्वरीतील जीसीएच्या मैदानावर होणार आहे.