>> शुभम गिलचे शतक; ईशान पोरेलचा भेदक मारा; जगज्जेतेपदासाठी आता गाठ ऑस्ट्रेलियाशी
शुभम गिलचे नाबाद शतक, कर्णधार पृथ्वी शॉ व मनज्योत कालरा यांची उपयुक्त खेळी आणि ईशान पोरेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर युवा टीम इंडियाने पाकिस्तानला २०३ धावांनी लोळवित न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम फेरीत आता भारताची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाशी पडणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युवा भारतीय संघाने ९ गडी गमावत २७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानी अंडर-१९ संघाचा ६९ धावांत खूर्दा केला.
२७३ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन खेळपट्टीवर उतरलेल्या पाकिस्तानी संघाची ईशान पोरेल व अन्य गोलंदाजांच्या भेदक मार्यापुढे भंबेरी उडाली. त्यांचा संपूर्ण संघ २९.३ षटकात ६९ धावांवर गारद झाला. रोहैल नझिरने सर्वाधिक १८ धावा जोडल्या. त्याच्या व्यतिरिक्त साद खानने १५ व मुहम्मद मुसाने ११ धावांपर्यंत मजल मारली. उर्वरित सातही फलंदाजाना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारतातर्फे ईशान पोरेलने १७ धावात ४ गडी बाद केले. त्याला उपयुक्त साथ देताना शिवा सिंग व रियान पराग यांनी प्रत्येकी २ तर अनुकूल रॉय, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अंडर-१९ युवा संघाने ९ गडी गमावत २७२ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार पृथ्वी शॉ (४१) व मनज्योत कालरा (४७) यांनी संघाला चांगली सुरुवात करून देताना ८९ धावांची भागीदारी केली. मोहम्मद मुसाने भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ याला अचूक फेकीवर धावचित करीत जमलेली ही जोडी फोडत १६व्या षट्कात पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिली. पृथ्वी ३ चौकार व १ षट्काराच्या सहाय्याने ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर कालराही ४७ धावा करून मुसाच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. मात्र, त्यानंतर खेळपट्टीवर उतरलेल्या शुबमन गिलने संघाची एक बाजू सांभाळून ठेवताना दमदार फलंदाजी करीत भारताचा डाव सावरतला. त्याने ७ चौकारांच्या सहाय्याने ९४ चेंडूत नाबाद १०२ धावांची आकर्षक खेळी करीत युवा टीम इंडियाला २७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. भारतीय फलंदाजीची पडझड सुरू असताना हार्विक देसाई (१०) आणि अनुकूल रॉय (३३) यांनी शुभमला उपयुक्त साथ देत संघाला अडीचशेच्या पार नेण्यात मोलाचा वाटा उचचला. पाकिस्तानतर्फे मोहम्मद मुसा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६७ धावांत ४ बळी मिळविले. तर अर्शद इक्बालने ३ व शाहीन शाह आफ्रिदीने १ गडी बाद केला.
शतकवीर शुभम गिलची समानावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
धावफलक,
भारत अंडर-१९ ः पृथ्वी शॉ धावचित (मुहम्मद मुसा) ४१, मनज्योत कारला झेल रोहेल नाझीर गो. मुहम्मद मुसा ४७, शुभम गिल नाबाद १०२, हार्विक देसाई झे. साद खान गो. अर्शद इक्बाल २०, रियान पराग झे. रोहैल नाझीर गो. अर्शद इक्बाल २, अभिषेक शर्मा झे. रोहैल नाझीर गो. अर्शद इक्बाल ५, अनुकूल रॉय झे. रोहैल नाझीर गो. मुहम्मद मुसा ३३, कमलेश नागरकोटी त्रिफळाचित शाहीन शाह आफ्रिदी १, शिवम मावी झे. व गो. मुहम्मद मुसा १०, शिवा सिंग पायचित गो. मुहम्मद मुसा १, ईशान पोरेल नाबाद १. अवांतर ः ९. एकूण ५० षट्कांत ९ बाद २७२ धावा.
गोलंदाजी ः अर्शद इक्बाल १०/०/५१/३, मुहम्मद मुसा १०/०/६७/४, शाहीन शाह आफ्रिदी १०/०/६२/१, हसन खान १०/०/४६/०, मोहम्मद तहा ७/०/३५/०, अली झर्याब आसिफ ३/०/११/०.
पाकिस्तान अंडर-१९ ः इम्रान शाह झे. पृथ्वी शॉ गो. ईशान पोरेल २, मुहम्मद झैद आलम झे. शिवम मावी गो. ईशान पोरेल ७, रोहैल नाझीर झे. शुभम गिल गो. रियान पराग १८, अली झर्याब आसिफ झे. पृथ्वी शॉ गो. ईशान पोरेल १, अम्मद आलम झे. शिवम मावी गो. ईशान पोरेल ४, मोहम्मद ताहा झे. कमलेश नागरकोटी गो. शिवा सिंग ४, साद खान यष्टिचित हार्विक देसाई गो. अनुकूल रॉय १५, हसन खान झे. शुभम गिल गो. पराग १, शाहीन शाह आफ्रिदी झे. व गो. शिवा सिंग ०, मुहम्मद मुसा नाबाद ११, अर्शद इक्बाल झे. ईशान पोरेल गो. अभिषेक शर्मा १.
अवांतर ः ५. एकूण २९.३ षट्कांत सर्वबाद ६९.
गोलंदाजी ः शिवम मावी ४/३/६/०, ईशान पोरेल ६/२/१७/४, कमलेश नागरकोटी ५/१/७/०, शिवा सिंग ८/०/२०/२, रियान पराग ४/१/६/२, अनुकूल रॉय २/०/११/१, अभिषेक शर्मा ०.३/०/०/१.
भारत अपराजित
विद्यमान अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अजून अपराजित आहे. अजून त्यांनी एकही सामना गमावलेला नाही आहे. लीग सामन्यांत त्यांनी ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाव्बेला पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला नमविले. तर उपांत्य फेरीत पाकिस्तानचा खुर्दा केला.