भारतीय हरितक्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचे निधन

0
23

>> कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य

>> गहू-तांदळाच्या विविध जाती केल्या भारतात विकसित

स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन (98) यांचे काल गुरूवारी दि. 28 सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धान्याच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामीनाथन यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या, मधुरा आणि नित्या असा परिवार आहे.
7 ऑगस्ट 1925 रोजी कुंभकोणम, तामिळनाडू येथे जन्मलेल्या स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव मनकोम्बू सांबाशिवन स्वामीनाथन होते. ते वनस्पती अनुवांशिक शास्त्रज्ञ होते. पंजाबमधील देशी वाणांसह मेक्सिकन बियांचे संकरीकरण करून त्यांनी 1966 मध्ये उच्च दर्जाचे गव्हाचे बियाणे विकसित केले.

स्वामीनाथन यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना, आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक काळात कृषी क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले आणि आपल्या देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली असल्याचे सांगितले.

स्वामीनाथन यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात स्वामीनाथन यांचा जन्म झाला. 1960 च्या दशकात जेव्हा नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची शक्यता होती, तेव्हा उच्च उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदळाच्या जाती भारतात आणल्याबद्दल आणि विकसित करण्यासाठी त्यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला होता.

जागतिक स्तरापर्यंत सन्मान
स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि नंतर आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून काम केले. कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिले.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण
स्वामीनाथन यांना 1971 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि 1986 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना 1967 मध्ये पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण आणि 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. स्वामीनाथन यांनी 1972 ते 1979 पर्यंत भारतीय कृषी संशोधन परिषदेत आणि 1982 ते 1988 पर्यंत आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत महासंचालक म्हणून काम केले.