– डॉ. हरिश्चंद्र नागवेकर
(मडगाव)
‘‘प्रिये पहा… रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा..’’ या गाण्याने व इतर अनेक गाण्यांनी रसिकांना धुंद करणारे व देशात सर्वत्र… ‘भारताचे आधुनिक तानसेन’ म्हणून ख्याती असलेले… स्वर-प्रभाकर पं. प्रभाकर कारेकर यानी यंदा दि. ४ जुलै २०१९ रोजी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त शनिवार दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत पं. प्रभाकर व सौ. प्रतिभा कारेकर दाम्पत्याचा रवींद्र भवन, मडगाव येथे गोमंतकीयांतर्फे जाहीर गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने…….
मुंबईत संगीत रसिकांनी स्वर-प्रभाकर पं. प्रभाकर कारेकर यांचा अमृत-महोत्सवी वाढदिवस थाटात साजरा केला. पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार आणि केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते त्यांच्या अमृतमहोत्सवी ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. मूळ गोमंतकीय असलेले व सध्या मुंबईत वास्तव्य असलेले श्री. प्रभाकर कारेकर हे गोवा-महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल भारत-वर्षाच्या संगीत नभा-मंडळातील सूर्य आहेत. गोमंतकीयांना त्यांचा अभिमान. म्हणूनच शनिवार दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत पं. प्रभाकर कारेकर व सौ. प्रतिभा कारेकर यांचा रवींद्र भवन, मडगाव येथे गोमंतकीयांतर्फे जाहीर गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्यांचे बालपण मडगावात गेल्याने व शिक्षणही मडगावात झाल्याने मडगावकरांनी त्यांना जवळून पाहिले आहे. प्रभाकर व त्यांचे कुटुंबीय माझे नातेवाईक असल्याने व त्यांचे वडील भाऊ विनायक (नारायण) हे पोर्तुगीज प्राथमिक शाळेत माझे सहाध्यायी असल्याने या कुटुंबाशी आमचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले. पोर्तुगीजांच्या काळात या कुटुंबाने राना-वनातून वाट काढीत मुंबई गाठली व मुंबईच आपली कर्मभूमी केली. विनायक यांनी कष्ट व चिकाटी यांच्या जोरावर मुंबईत उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक असे यश प्राप्त केले. तर प्रभाकर यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर आणि संगीत क्षेत्रातील अखंड साधना आणि जिद्द यांच्या जोरावर शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात गोड गळ्याचा गायक म्हणून संगीत-रसिकांमध्ये नाव मिळवले.
काही वर्षांआधी प्रभाकरचे वडीलबंधू विनायक यांच्या मुंबईत झालेल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला मी प्रमुख पाहुणा होतो. नंतर गोव्यात झालेल्या, प्रभाकर यांच्या दोन सत्कार-सोहळ्यात माझा सहभाग होता. या सोहळ्यात त्यांच्या कार्यावर बोलण्याची मला जशी संधी मिळाली, तसेच वृत्तपत्रात मी त्यांच्यावर लिहिलेलेही आहे. त्यांचे वडील जनार्दनपंत यांनी माझ्याशी बोलताना आपल्या दोन्ही मुलांविषयी नेहमीच सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. मुंबईत सुरुवातीच्या काळात फुटपाथवर झोपून दिवस काढलेल्या – कुटुंबातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात अखिल भारतात कीर्ति मिळवावी, ही खचितच गौरवास्पद गोष्ट आहे. प्रभाकर हे आज एक उत्कृष्ट गायक म्हणून गाजत आहेत. परंतु हा दिवस त्यांच्या आयुष्यात सहजासहजी आलेला नाही. त्यामागे त्यांनी केलेली संगीताची अखंड साधना आहेच. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक यशस्वी शास्त्रीय गायक व्हावे, ही त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आहे, हे आपण विसरता कामा नये. भारतात संगीताचे शिक्षण हे हल्लीच्या काळातच शाळा-कॉलेजमध्ये मिळू लागले आहे. त्यापूर्वी हजारो वर्षांपासून संगीत शिकण्यासाठी शिष्यांना गुरूच्या घरी राहूनच संगीताचा अभ्यास करावा लागत असे. आजसुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्या देशात हीच परंपरा चालू आहे. प्रभाकर यांना याच परंपरेच्या प्रक्रियेतून जावे लागले.
सुरुवातीला पंडित सुरेश हळदणकर या गुरुंकडे त्यांनी दहा वर्षे संगीत साधना केली व संगीताचे मुलभूत ज्ञान आत्मसात केले. पं. हळदणकर यांच्यानंतर प्रभाकर यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायनाची तालीम सुरू केली. त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्तीही मिळू लागली. परंतु ती दोनच वर्षे मिळाली. पं. अभिषेकी यांच्याकडे आठ वर्षे संगीत-साधनेचा प्रवास केल्यानंतर त्यांच्या शास्त्रीय गायनाचा पाया अधिक मजबूत बनला. त्यांच्या गायन कलेत विविधता व परिपक्वताही आली. त्यानंतर पंडित प्रभाकर कारेकर यांनी आपल्या संगीताचा पुढील प्रवास पं. सी. आर. व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करून शास्त्रीय संगीताचे आपले कौशल्य अधिक प्रभावी व दमदार बनविले. आपल्या आयुष्यात त्यांना अनेक गौरव प्राप्त झालेले आहेत. तानसेन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कंठसंगीत पुरस्कार, भीमसेन जोशी पुरस्कार, पं. राम मराठे पुरस्कार, तसेच लता मंगेशकर पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार व हल्लीच राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्राप्त झालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार… अशा कितीतरी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. स्व. दयानंद बांदोडकर, स्व. मोरारजी देसाई, श्री. दिलीपकुमार इत्यादी थोरामोठ्यांनी त्यांचे गायन ऐकून त्यांचे कौतुक केले आहे. भरगच्च सभागृहातील त्यांच्या मैफलींमध्ये रसिकांनी त्यांना नेहमीच डोक्यावर घेतलेले आहे. परंतु रसिकांच्या कौतुकाने प्रभाकर यांना गर्वाचा यत्किचिंतही स्पर्श झालेला नाही. एवढेच नव्हे तर सुरुवातीच्या कठीण काळात त्यांना मदतीचा हात दिलेल्या माहीम-मुंबईच्या रघुवीर भट यांचा व इतर अनेकांचा त्यांना कधीच विसर पडलेला नाही. पंडितजी हे केवळ गोड गळ्याचेच नाहीत तर ते गोड शब्दांचे, गोड स्वभावाचेही आहेत, हे त्यांच्या कार्याने त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या गायनात ‘‘स्वर, लय व शब्द’’ या त्रयींचा सुरेल संगम आपल्याला जाणवतो. तसेच त्यांच्या हृदयातील भावनांचाही आपल्याला स्पर्श होतो.
प्रभाकरजींची वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर फोंडा येथील राजीव कला मंदिरात २००५ मध्ये स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते व नंतर मडगाव येथील आना फोंत गार्डनमध्ये २००६ मध्ये श्री. दिगंबर कामत यांच्या हस्ते त्यांचा भावपूर्ण गौरव झाला होता. परंतु मला भावलेला त्यांचा गोवा विधानसभेतील सत्कार हा ‘युनिक’ आहे असे मला वाटते. त्यांना संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोवा विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने पास झाला. तेव्हा विद्यमान सभापती श्री. राजेश पाटणेकर यांनी पंडितजींनी गायिलेले प्रसिद्ध नाट्यगीत ‘‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा…’’ गाऊन दाखवले. त्यावेळी प्रतापसिंह राणे यांनी पाटणेकर यांचेही अभिनंदन केले होते.
आज शनिवार दि. १४ रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे सायंकाळी ६.३० वा.
पं. प्रभाकर व सौ. प्रतिभा कारेकर यांच्या सत्कारावेळी प्रमुख वक्ता म्हणून सातार्याचे लेखा अधिकारी व साहित्यिक श्री. अरुण गोडबोले लाभले आहेत. सत्कारपूर्व सत्रात म्हणजे दुपारी ३.३० वा. बहारदार नाट्यसंगीताचा कार्यक्रम होणार असून त्यात त्यांचे शिष्य संदेश वसंत खेडेकर, सौ. सुमेधा देसाई हे गोव्यातील व सौ. मंजुषा कुलकर्णी पाटील (पुणे-महाराष्ट्र) यांचे गायन सादर होणार आहे. शेवटच्या सत्रात सायं. ७.३० वा. पद्मश्री पं. एम. व्यंकटेश कुमार, धारवाड यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
खरोखरच, भारतीय संगीताचा उषःकाल प्रभाकरजींनी संगीताच्या नभोमंडळात प्रकाशाच्या दिशेने दमदारपणे पुढे नेला. गोवा व महाराष्ट्र यांचेच नव्हे तर अखिल भारताचे भूषण असलेल्या पंडित प्रभाकर कारेकर यांना माझ्या व माझ्या सर्व कुटुंबियांच्या, तसेच सर्व संगीत-रसिकांच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पत्नी प्रतिभाताई व सर्व कुटुंबीय यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्!!