भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
22

>> रशियाच्या खारकीव्हमधील बॉम्बहल्ल्यात मृत्यूमुखी

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचा भडका उडाला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी विमानाने सुखरुप आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. याचदरम्यान काल रशियाने युक्रेनच्या खारकीव्हमध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, काल रशियाने खारकीव्हमधील सर्वात मोठ्या मुख्य सरकारी इमारतीवर बॉम्ब हल्ला केला.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या खारकीव्हमध्ये काल सकाळी बॉम्ब हल्ले करण्यात आले, त्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. सदर मृत २१ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा गायनागोदर असे असून, तो कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील चलगेरी येथील रहिवासी होता.

नवीनचे पार्थिव मायदेशी आणण्याचे प्रयत्न
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या वृत्ताला कर्नाटक सरकारने दुजोरा दिला आहे. कर्नाटकमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याच्या वडिलांशी संवाद साधला. नवीन शेखरप्पा गायनागोदर याचे पार्थिव मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडून नवीनच्या कुटुंबीयांचे सांत्वन
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीनच्या घरी फोन केला आणि त्याच्या वडिलांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

तीन दिवसांत २६ विमानांद्वारे भारतीयांना मायदेशी आणणार

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल पत्रकार परिषद घेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुखरूप घरवापसीचा मार्ग सांगितला. येत्या तीन दिवसांत विमानांची २६ उड्डाणे केली जातील. सी-१७ हे विमान बुधवारी पहाटे चार वाजता रोमानियाला रवाना होईल. आम्ही पहिली मार्गदर्शक सूचना जारी केली होती, त्यावेळी युक्रेनमध्ये सुमारे २०,००० भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये होते, तेव्हापासून सुमारे १२,००० विद्यार्थी युक्रेन सोडून गेले आहेत. उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी हे युद्ध क्षेत्रात आहेत आणि अर्धे युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत, अशी माहिती हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली.