भारतीय भाषांमध्ये वैरभाव नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
2

राजधानी दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात; 3 दिवस चालणार

भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नाही. भाषांनी नेहमीच एकमेकांवर प्रभाव टाकला आहे आणि एकमेकांना समृद्ध केले आहे. अनेकदा जेव्हा भाषेच्या आधारावर विभागणी करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आपला सामायिक भाषिक वारसा जोरदार प्रतिकार करतो. भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. मराठी ही एक परिपूर्ण भाषा आहे. मराठीत शूरता आणि वीरता देखील आहे. मराठीत सौंदर्य आहे आणि संवेदनाही आहे. समानता आहे आणि समरस्ता देखील आहे. अध्यात्माचे आणि आधुनिकतेचे स्वर देखील आहेत. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषा अमृतापेक्षाही जास्त गोड आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले.

राजधानी दिल्लीत कालपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत चालेल. काल दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. ‘देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार’, या ओळींनी मोदींनी भाषणाला प्रारंभ केला.आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’ म्हणजे मराठी भाषा ही अमृतापेक्षाही गोड आहे. मराठी भाषेप्रति माझे कायम प्रेम आहे. मी नेहमी मराठीमधील नवनवीन शब्द शिकण्याचा माझा प्रयत्न असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संमेलनाची काश्मिरी कन्या रुकय्या मकबूल हिच्या आवाजात मराठीप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या प्राकृत भाषेतील सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या मंगलकामना करणाऱ्या जैन धर्मातील नवकार मंत्राने सुरुवात झाली, तर या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. संत ज्ञानेश्वर यांचे पसायदान शमीमा आख्तर यांचे आवाजात झाले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भाषा जोडणारी हवी; तोडणारी नव्हे

संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकरांचे मत

मराठी फक्त लिखितच नाही, तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही, असे मत दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. एक स्त्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हे महत्वाचे नाही, तर गुणवत्ता हा विषय महत्वाचा आहे, असेही भवाळकर म्हणाल्या. मराठी भाषा संतांनी टिकवली. आमचे संत पुरोगामी होते; ‘फुरोगामी’ लोक काहीही म्हणू देत, असेही भवाळकर म्हणाल्या. तारा भवाळकरांच्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांनी दाद दिली.
भाषा ही बोलली तर जीवंत राहते, नुसती पुस्तकात आणि ग्रंथात असून काही उपयोग नाही. महाराष्ट्राला पाडुंरंगाचे स्मरण करायला लावणारी ही मराठी भाषा आमच्या संतांनी जिवंत ठेवली. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी॥ लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी॥’ असे सांगणारे संत सावता माळी यांनी मराठी भाषा टिकवली. ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे, या संतांनी मराठी भाषा जिवंत ठेवल्याचे भवाळकर म्हणाल्या.