भारतीय फुटबॉलचा तेजस्वी तारा पी. के. बॅनर्जी

0
180

–  सुधाकर रामचंद्र नाईक

भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे प्रमुख साक्षीदार तथा दिग्गज फुटबॉलपटू प्रदीपकुमार ऊर्फ पी. के. बॅनर्जी (83) यांचे नुकतेच दीघर्ं आजाराने निधन झाले. विलक्षण विस्मयकारी पदलालित्य आणि नजाकतदार नैपुण्यकौशल्याने तमाम भारतीय फुटबॉलप्रेमींची मने जिंकलेले प्रदीपदा यांनी सुमारे पाच दशकांहून अधिक काळ भारतीय फुटबॉलची अविरत सेवा केली. गेल्या काही वर्षांपासून पीके न्युमोनियाने श्वसनक्रियेच्या आजाराने त्रस्त होते. पार्किन्सन, हृदयाघात, डिमेन्शिया आदी आजारांनीही त्यांना ग्रासले होते. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच ते कोलकात्यातील इस्पितळात दाखल होते आणि अखेर गेल्या शुक्रवार दि. 20 रोजी मध्यरात्री त्यांनी इहलोक त्यागला.

23 जून 1936 रोजी पश्चिम बंगालमधील जलपायगुडी परगण्यातील मोयनागुडी गावात जन्मलेले पीके यांचे कुटुंबीय फाळणीनंतर जमशेदपूर येथे स्थायिक झाले. बंगाली असल्याने फुटबॉलचे गुण जन्मजात लाभलेले प्रदीपदा बालपणापासूनच फुटबॉलमध्ये रमले. 1952 मध्ये अवघ्या 16व्या वर्षी संतोष चषक स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व केलेल्या पीके यांनी फुटबॉलबरोबरील आपले नाते अखेरपर्यंत जपताना तब्बल 51 वर्षे विविधरूपाने भारतीय फुटबॉलसाठी भरीव योगदान दिले.

1962 मधील आशियाई मेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या प्रदीपदानी भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगात आपला ठसा उमटविताना 84 सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 65 आंतरराष्ट्रीय गोल नोंदले. पीके, चुन्नी गोस्वामी आणि तुलशीदास बलराम हे भारतीय फुटबॉलमधील प्रख्यात त्रिकुट ‘होली ट्रिनिटी’ या उपनावाने ख्यात बनले होते. 1956 मधील मेलबर्न ऑलिंपिक हा त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक धवलांकित क्षण ठरावा. भारतीय संघाने या ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान मिळविले. विशेेष म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 4-2 असा सनसनाटी विजय मिळविला आणि त्यात पीके यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. 1960 साली रोम येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये प्रदीपदांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले होते. ही भारतीय फुटबॉल संघाची आतापर्यंतची शेवटची ऑलिंपिक होय.

18 डिसेंबर 1955 रोजी प्रदीपदांनी ढाका येथील चौरंगी स्पर्धेत श्रीलंकाविरुद्ध शानदार आंतरराष्ट्रीय फुटबॉल पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय पदार्पणात त्यांनी आपला ठसा उमटविताना भारताच्या अजिंक्यपदात महत्त्वपूर्ण योगदान देत सर्वाधिक पाच गोल नोंदले.

टोकियो (1958), जकार्ता (1962) आणि बँकॉक (1962) आदी सलग चार एशियन गेम्समध्ये प्रदीपदांनी भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. जकार्तामधील गेम्सचे  सुवर्णपदक भारतीय संघाने जिंकले. एशियन गेम्समध्ये सर्वाधिक सहा गोल नोंदण्याचा पराक्रमही पीके यांनी नोंदला आहे.

1956 मधील मेलबर्न ऑलिंपिकमधील उपउपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावरील  4-2 अशा विजयातही पीकेनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते आणि भारतीय संघाला या स्पर्धेत चौथे स्थान मिळाले होते. 1960 मधील रोम ऑलिंपिकमधील फ्रान्सविरुद्धची लढत 1-1 अशी अनिर्णित राखण्यातही कर्णधार या नात्याने त्यानी योगदान देताना भारतातर्फे गोल नोंदला होता.

आपल्या फुटबॉल कारकिर्दीत कोलकात्याच्या बलाढ्य ईस्ट बंगाल वा मोहन बगान या क्लब्सचे प्रतिनिधित्व न करता त्यानी ईस्टर्न रेल्वेजतर्फे खेळणे पसंत केले होते.

1967 साली प्रदीपदांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली, पण फुटबॉलबरोबरील त्यांची नाळ कायम राहिली. ‘फिफा’ प्रशिक्षक प्रमाणपत्रधारित प्रदीपदांची प्रशिक्षकपदाची कारकीर्दही यशस्वी, वलयांकित ठरली. बाटा स्पोर्टस क्लब आणि ईस्टर्न रेल्वेजतर्फे प्रशिक्षकपदाची कारकीर्द सुरू केलेल्या प्रदीपदांना 35व् या वर्षी जी. एम. बाशा यांच्यासमवेत भारतीय फुटबॉल संघाचे संयुक्त प्रशिक्षकपद भूषविण्याची संधी मिळाली. या जोडीने 1970 मधील बँकॉक एशियाडमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले. वर्षभरानंतर 1971 मध्ये प्रदीपदांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने सिंगापूर पेस्टा सुकान कप स्पर्धेंतही यश मिळविले. बॅनर्जी यांनी चार एशियन गेम्स तसेच पाच वेळा मेर्डेका कप तसेच अन्य काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविले.

ईस्ट बंगाल आणि मोहन बगान या कोलकात्याच्या बलाढ्य फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपदही प्रदीपदांनी भूषविले. पीके बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने सलग पाच वेळा कोलकाता फुटबॉल लीग अजिंक्यपदे प्राप्त केली. मोहन बागानलाही त्यांनी 1977 मध्ये आयएफए शिल्ड, रोव्हर्स कप, ड्युरँड कप अशी तीन प्रमुख अजिंक्यपदे मिळवून दिली.

राष्ट्रीयस्तरावर प्रदीपदांनी बंगालला (1955, 1958, 1959) आणि रेल्वेला (1961, 1964, 1966) अशी प्रत्येकी तीन वेळा राष्ट्रीय संतोष चषक फुटबॉल अजिंक्यपदे मिळवून दिली. क्लबस्तरावर प्रदीपदांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने 30 तर मोहन बागानने 23 विजेतेपदे प्राप्त केली. कॉस्मास (यूएसए) येथे झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात पीकेच्या मार्गदर्शनाखालील मोहन बगानने दिग्गज आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पेलेचा समावेश असलेल्या संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले होते.

1991 ते 97 या कालावधीत पीके यांनी टाटा फुटबॉल अकादमीचे तांत्रिक प्रशिक्षक म्हणूनही योगदान दिले.

क्रीडाक्षेत्रातील मान्यवंतासाठी देण्यात येणारा, प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविणारे प्रदीपदा हे पहिले फुटबॉलपटू होत, 1961 मध्ये त्यांना हा मान मिळाला आणि नंतर 1990 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना ‘फिफा’नेही बॅनर्जी यांच्या भारतीय फुटबॉलमधील योगदानाची दखल घेताना 1990 मध्ये ‘फिफा फेअर प्ले’ पुरस्काराने आणि 2004 मध्ये ‘फिफा ऑर्डर ऑफ मेरिट’ किताब बहाल करीत योग्यतम गौरव केला होता.

पी. के. बॅनर्जी यांच्यामागे पाउला आणि पूर्णा या दोन कन्या असून दोघीही शिक्षणतज्ज्ञ आहेत. बंधू प्रसून बॅनर्जी हे माजी भारतीय फुटबॉल कर्णधार तसेच तृणमूल काँग्रेसचे विद्यमान लोकसभा सदस्य आहेत.

भारतीय फुटबॉल विश्वातील सुवर्णयुगाचे साक्षीदार म्हणून तुम्ही कायम स्मरणात रहाल. भारतीय फुटबॉलप्रती आपले योगदान चिरंतन असेल, अशा शब्दांत एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्याना श्रध्दांजली वाहिली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी भारतीय कर्णधार तथा बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह अनेक मान्यवंतांनी प्रदीपदांना श्रध्दांजली वाहिली. भारतीय फुटबॉल महासंघाच्या दिल्ली येथील मुख्यालयाचा ध्वज अर्ध्यावर ठेवून, अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी आयुष्य वेचलेल्या या महान फुटबॉलपटूला साजेशी मानवंदना दिलेली असून त्यांच्या धवल कारकिर्दीपासून बोध घेत युवा खेळाडूंनी भारतीय फुटबॉलला पुन्हा सुवर्णयुग प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरावी.