जकार्ता
इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३३ कांस्य मिळून भारताने एकूण ७२ पदकांची कमाई करीत पदकतक्त्यात नववे स्थान प्राप्त केले. चीनने ३१८ पदकांसह प्रथम, दक्षिण कोरियाने द्वितीय तर इराणने तृतीय स्थान मिळविले. २०१० साली भारताच्या खात्यात फक्त १४ पदकं आली होती, तर २०१४ साली भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सुधारणा करत पदकांची संख्या ३३ वर नेली. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या प्रमोद भगतने बॅडमिंटन एकेरी प्रकारात इंडोनेशियाच्या उकुन रुकेंडीचा पराभव करत सुवर्णपदक पटकविले तर तरुणने चीनच्या खेळाडूवर मात करत बॅडमिंटन एसएल४ प्रकारात आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली.