
>> इंग्लंडचा १ डाव व १५९ धावांनी विजय
>> मालिकेत २-० अशी आघाडी
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच टीम इंडियाला एक डाव व १५९ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ न होतादेखील यजमानांनी पुढील तीन दिवसांत पाहुण्यांचा खेळ खल्लास केला. आपला पहिला डाव ७ बाद ३९६ धावांवर घोषित करत इंग्लंडने भारताचा दुसरा डाव १३० धावांत संपवला. भारताला पहिल्या डावात केवळ १०७ धावांपर्यंत मजल मारता आली होती.
तिसर्या दिवसाच्या ६ बाद ३५७ धावांवरून काल पुढे खेळताना इंग्लंडने सॅम करन (४०) याच्या पतनानंतर आपला पहिला डाव घोषित केला. या द्वारे इंग्लंडने पहिल्या डावाच्या आधारे २८९ धावांची मोठी आघाडी घेतली. भारताच्या दुसर्या डावाची सुरुवातही पहिल्या डावाप्रमाणेच चाचपडत झाली. पहिल्या डावात पाच चेंडू खेळूनही भोपळा फोडू न शकलेला मुरली विजय दुसर्या डावात ८ चेंडू खर्च करूनही भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. यावेळी भारताने धावांचे खातेदेखील उघडले नव्हते. सलग दुसर्यांदा अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीसमोर त्याने गुडघे टेकले. कसोटीच्या दोन्ही डावात शून्यावर बाद होणारा तो सहावा भारतीय ठरला. राहुल दुसर्या गड्याच्या रुपात परतला. त्याने दहा धावांचे योगदान दिले. कर्णधार विराट कोहली पाठदुखीने त्रस्त असल्याने अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. परंतु, यावेळीदेखील शरीरापासून दूर खेळण्याच्या नादात स्लिपमध्ये जेनिंग्सच्या हातात सोपा झेल देऊन तो तंबूत परतला. चेतेश्वर पुजाराने आपल्या १७ धावांसाठी ८७ चेंडू खेळले. पण, ब्रॉडच्या झपकन आत आलेल्या चेंडूवर ‘अक्रॉस द लाईन’ खेेळण्याच्या नादात त्याला आपली यष्टी गमवावी लागली. इंग्लंडने यानंतर कर्णधार कोहलीसाठी शरीरवेधी रणनीती आखली. शॉर्टलेगला नवोदित ओली पोप याला ठेवताना त्यांनी कोहलीला योजनाबद्धरित्या बाद केले. हार्दिक पंड्याने यानंतर २६ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावाप्रमाणेच रविचंद्रन अश्विन दुसर्या डावातील भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तो ३३ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून अँडरसन व ब्रॉडने प्रत्येकी ४ तर वोक्सने २ गडी बाद केले.
धावफलक
भारत सर्वबाद १०७
इंग्लंड पहिला डाव (६ बाद ३५७ वरून) ः ख्रिस वोक्स नाबाद १३७, सॅम करन झे. शमी गो. पंड्या ४०, अवांतर २३, एकूण ८८.१ षटकांत ७ बाद ३९६ घोषित
गोलंदाजी ः इशांत शर्मा २२-४-१०१-१, मोहम्मद शमी २३-४-९६-३, कुलदीप यादव ९-१-४४-०, हार्दिक पंड्या १७.१-०-६६-३, रविचंद्रन अश्विन १७-१-६८-०
भारत दुसरा डाव ः मुरली विजय झे. बॅअरस्टोव गो. अँडरसन ०, लोकेश राहुल पायचीत गो. अँडरसन १०, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ब्रॉड १७, अजिंक्य रहाणे झे. जेनिंग्स गो. ब्रॉड १३, विराट कोहली झे. पोप गो. ब्रॉड १७, हार्दिक पंड्या पायचीत गो. वोक्स २६, दिनेश कार्तिक पायचीत गो. ब्रॉड ०, रविचंद्रन अश्विन नाबाद ३३, कुलदीप यादव त्रि. गो. अँडरसन ०, मोहम्मद शमी पायचीत गो. अँडरसन ०, इशांत शर्मा झे. पोप गो. वोक्स २, अवांतर १२, एकूण ४७ षटकांत सर्वबाद १३०
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन १२-५-२३-४, स्टुअर्ट ब्रॉड १६-६-४४-४, ख्रिस वोक्स १०-२-२४-२, सॅम करन ९-१-२७-०
क्रिकेटच्या पंढरीत अँडरसनचे शतक
इंग्लंडचा स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसनने लॉडर्स मैदानावर काल बळींचे शतक पूर्ण केले. एका मैदानावर शंभर किंवा जास्त बळी घेणारा तो जगातील केवळ दुसरा गोलंदाज बनला. श्रीलंकेचा विश्वविक्रमी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने एसएससी कोलंबो (१६६ बळी), असगरिया स्टेडियम कँडी (११७) व गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम (१११) या तीन मैदानांवर शंभराहून जास्त बळी घेतले आहेत.