पाकिस्तानमध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतातील उत्तरी वझिरीस्तानमध्ये नुकताच पाकिस्तानी सैनिकांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला होऊन त्यात तेरा सैनिक ठार झाले. पाकिस्तानने त्या हल्ल्याचे खापर भारतावर फोडले आहे. पाकिस्तानात खुट्ट जरी झाले, तरी त्याचे खापर भारतावर फोडण्याची प्रथाच अलीकडे पडली आहे. त्यामुळे ह्या हल्ल्याचा सूड घेण्याच्या वल्गना पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्डमार्शल असीम मुनीर यांनी केल्या आहेत. त्याच बरोबर भारतातील काश्मीरींच्या मागे आम्ही उभे आहोत अशी भाषाही त्यांनी केली आहे. रक्ताचा बदला रक्ताने घेऊ अशी चिथावणीखोर भाषा ते वापरत आहेत. ऑपरेशन सिंदूरने एवढे नाक कापले गेल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी जिरलेली नाही हेच ह्यावरून सिद्ध होते. पाकिस्तानात घातपाती कारवाया काही नव्या नाहीत. मध्यंतरी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीत पडण्याच्या भीतीने पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली. विशेषतः अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये जोरदार लष्करी कारवाया झाल्या. त्यातून काही काळ तेथील दहशतवाद थंडावला होता, परंतु तो नंतर तितक्याच जोरात उफाळला हेही जग पाहत आले आहे. मुळात पाकिस्तानातील सत्ताच सतत डळमळीत स्थितीत असल्याने दहशतवाद्यांचे तेथे फावत आले आहे. तेहरिक इ तालिबान पाकिस्तानसारखी दहशतवादी संघटना पाकिस्तानात सातत्याने घातपात घडवीत आली आहे. दुसरीकडे बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांतांमधील पाकिस्तानच्या आजवरच्या दमननीतीचा प्रतिकार तितक्याच ताकदीने तेथे होऊ लागला आहे. त्यातूनच पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत राहिली आहे. पेराल ते उगवेल म्हणतात तसलाच हा प्रकार आहे. मात्र, पाकिस्तान सारे खापर भारतावर फोडून मोकळा होऊन आपले हात झटकताना दिसतो. खैबर पख्तुनख्वामधील सध्याचा हल्ला आपल्या काश्मीरमधील पुलवामासदृश्य आहे. पुलवाम्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर एक स्फोटके भरलेली व्हॅन आदळवून मोठा स्फोट घडवला गेला होता, ज्यात आपले चाळीस जवान हकनाक मारले गेले होते. उत्तरी वझिरीस्तानमधील ताजा हल्लाही आत्मघातीच आहे. स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा दलांच्या ताफ्यावर येऊन धडकले आणि स्फोट झाला, ज्यात तेरा सैनिक मारले गेले. त्या हल्ल्याची जबाबदारी फितना उल खावरजी या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तान मात्र त्या संघटनेला भारताची हस्तक ठरवून आपले हात झटकताना दिसते. एकीकडे तेहरिक ई तालिबान पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया, दुसरीकडे बलोच लिबरेशन आर्मीचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष, खैबर पख्तुनख्वामधील फुटिरतावादी चळवळी ह्या सगळ्याचा दोष भारताच्या माथी मारल्याने पाकिस्तानला आपण वर्षानुवर्षे तेथील जनतेवर केलेले अत्याचार आणि दडपशाही झाकता येणार नाही. अलीकडेच पाकिस्तानी सेनेने दक्षिणी वझिरीस्तानमध्ये केलेल्या कारवाईत चौदा फुटिरतावादी मारले गेले होते. त्याचा सूड ताज्या हल्ल्यातून उगवलेला असू शकतो. परंतु भारताकडे बोट दाखवले की जगाची सहानुभूती मिळवता येईल असे पाकिस्तानला वाटते. तेहरीक ई तालिबान पाकिस्तानची पाकिस्तान सरकारशी असलेली युद्धबंदी 2022 च्या नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली. तेव्हापासून हल्ल्यांमध्ये जर वाढ झालेली असेल तर त्यात दोष भारताचा म्हणता येणार नाही. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचे ते घोर अपयश आहे. आणि जो देश आपल्या जन्मापासून भारतामध्ये घातपाती कारवाया घडवीत आला, त्याच्या पापाचे घडे भरले असतील आणि काळाचे चक्र उलटावे त्याप्रमाणे आता दहशतवादाने पाकिस्तानचीच मानगूट पकडलेली असेल तर त्याचे खापर भारतावर फोडणे योग्य नव्हे. गेल्या वर्षी पाकिस्तानात दहशतवादी घटनांमध्ये 1081 लोक ठार झाले. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 45 टक्के आहे. परंतु दहशतवादात झालेल्या वाढीमागे पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता आणि आपल्या डोळ्यांतले मुसळ बघण्यापेक्षा दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ शोधण्याची तेथील नेत्यांची वृत्तीच कारणीभूत आहे. भारताबरोबरचे संबंध बिघडण्यास त्यांचा भारतद्वेषच कारणीभूत आहे. भारताने पाकिस्तानशी अनेकदा मैत्रीचा हात पुढे केला. परंतु प्रत्येक वेळी त्याचे उत्तर विश्वासघातानेच मिळाले. आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था भिकेकंगाल स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भिकेवर तो देश जगतो आहे. तरीही आपली अर्थव्यवस्था कर्जबाजारी होण्याचा धोका कमी झाल्याची शेखी तो मिरवतो आहे. पाकिस्तानला दहशतवादापासून मुक्ती हवी असेल तर त्याने स्वतः पोसलेल्या दहशतवादाला खतपाणी घालणे बंद केले पाहिजे. अन्यथा ठोशास ठोसा मिळणारच. घरच्या समस्यांसाठी भारताकडे बोट दाखवून येथे काही घातपाती उपद्व्याप करण्याचे मनसुबे जर तो रचत असेल, तर ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही याचे त्यांना स्मरण करून द्यावे लागेल.