भारताला 100 टक्के आयात शुल्क लागू करणार; व्यापारयुद्ध भडकणार?

0
4

>> अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून घोषणा; 2 एप्रिलपासून शुल्क आकारणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकन संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आगामी आंतरराष्ट्रीय भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारत, चीन, कॅनडा, दक्षिण कोरिया अशा देशांवर अमेरिकेकडून जशास तसे आयात शुल्क (टेरिफ) लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 2 एप्रिलपासून नवे आयात शुल्क दर लागू होतील, असेही त्यांनी जाहीर केले. भारत आमच्यावर 100 टक्के आयात शुल्क लावतो, हे ठीक नाही. जेवढे शुल्क इतर देश आपल्यावर लागू करतील, तेवढेच शुल्क आपल्याकडूनही त्यांच्यावर लागू केले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी आपण 2 तारीखच यासाठी का निवडली, याबाबत ट्रम्प यांनी मिश्किल भाष्य केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) अमेरिकन संसदेच्या (काँग्रेस) संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्यांनी 1 तास 44 मिनिटांचे विक्रमी भाषण दिले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘अमेरिका इज बॅक’ म्हणजेच अमेरिकेचे युग परत आले आहे, अशा शब्दांनी केली.
गेली अनेक दशके दुसरे देश आमच्याविरोधात टेरिफचा वापर करत आहेत; परंतु आता आमची बारी आहे. आम्ही याच टेरिफचा त्या देशांविरोधात वापर करू. आमच्या सरकारकडून कंपन्यांवर टेरिफ आकारले जाईल. ज्या कंपन्या त्यांचे उत्पादन अमेरिकेत करणार नाहीत, त्या कंपन्यांवर जास्त शुल्क आकारले जाईल, असे ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.

अंमलबजावणीसाठी 2 एप्रिलच का?
नवे टेरिफ दर 1 एप्रिलऐवजी 2 एप्रिललाच लागू करण्याचा निर्णय का घेतला? यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिले. मला खरे तर हे नवे बदल 1 एप्रिलपासूनच लागू करायचे होते. पण त्यामुळे माझ्यावर ‘एप्रिल फूल’चे आरोप व्हावेत, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. एका दिवसामुळे आपले खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पण तरीही आपण 2 एप्रिललाच हे बदल लागू करणार आहोत. मी एक खूप श्रद्धाळू माणूस आहे, असे ट्रम्प यांनी म्हणताच समोर बसलेल्या सिनेट सदस्यांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, मेक्सिको व कॅनडा या दोन शेजारी देशांवर ट्रम्प प्रशासनाने नवे शुल्क लागू केले आहेत. त्यानुसार या दोन्ही देशांवर अमेरिकेने 25 टक्के टेरिफ लागू केले आहेत.

टेरिफ म्हणजे काय?
टेरिफ हा एक प्रकारचा कर आहे, जो सरकार आयात आणि निर्यात होणाऱ्या वस्तू किंवा सेवांवर वसूल करते. त्याचा मुख्य हेतू देशाच्या अर्थव्यवस्थेला नियंत्रित करणे, देशातील उद्योगांचे संरक्षण करणे, महसूल कमावणे आणि व्यावसायिक समतोल साधणे हे असते. समजा, भारताचा उद्योगपती अमेरिकेहून एखादी वस्तू मागवतो, त्याची किंमत 100 रुपये असेल. जर भारत त्यावर 100 रुपये प्रतिकिलो टेरिफ लावत असेल तर त्या वस्तूसाठी 200 रुपये खर्च येईल. त्यामुळे अमेरिकेतील उत्पादन भारतीय बाजारपेठेत महाग होतात. याचा परिणाम ग्राहक कमी होतो. जगातील बरेच देश त्यांच्या देशातील उत्पादनांना संरक्षण देण्यासाठी हे पाऊल उचलतात.

चीनकडून चोख प्रत्युत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लादले आहे. त्याला आता चीनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुम्हाला व्यापार युद्ध छेडायचे असेल तर ते शेवटपर्यंत लढण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा चीनने दिला आहे.

भारत 100 टक्क्यांहून जास्त शुल्क आकारतो
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कांवर टिप्पणी केली. भारताकडून आपल्यावर ऑटो क्षेत्रात 100 टक्क्यांहून अधिक शुल्क आकारले जातात. दुसरीकडे अमेरिकेकडून चीनवर जेवढे टेरिफ दर लागू केले जातात, त्याच्या दुप्पट दर हे चीनकडून अमेरिकन उत्पादनांवर लागू केले जात आहेत. दक्षिण कोरियाकडून आकारल्या जाणाऱ्या टेरिफचे प्रमाण तर चौपट आहे, असे ट्रम्प म्हणाले.
आपण दक्षिण कोरियाला खूप सारी लष्करी मदत करतो. पण त्याबदल्यात हे सगळे घडत आहे. आपल्या बाबतीत हे जसे आपल्या शत्रूंकडून होते आहे, तसेच ते मित्रांकडूनही होते आहे. ही व्यवस्था अमेरिकेसाठी न्याय्य नाही, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.