भारताला पर्यटन क्षेत्रात जागतिक गुंतवणूक हवी

0
8

>> केंद्रीय पर्यटनमंत्री; काश्मीरमध्ये जी-20 बैठकीला सुरुवात

काश्मीरमध्ये कालपासून तीन दिवसीय जी-20 च्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत 25 देश सहभागी झाले, तर चीन, तुर्की आणि सौदी अरब या देशांनी बैठकीत सहभाग घेतला नाही. खाजगी गुंतवणुकीशिवाय भारत जागतिक पर्यटन स्थळ होऊ शकत नाही. म्हणूनच आम्हाला जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूक हवी आहे, असे केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी या बैठकीत सांगितले.

श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी झझाले. जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला होता. बैठक स्थळाकडे जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच जी-20 प्रतिनिधींची संख्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गुलमर्गचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
यावेळी रेड्डी यांनी एफडीआयवरही भाष्य केले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ईशान्येकडील राज्ये आणि डोंगराळ राज्यांसह 100 टक्के एफडीआयला देखील प्रोत्साहन देत आहोत, असे रेड्डी म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये इको-टुरिझम, फिल्म टुरिझम आणि ॲडव्हेंचर टुरिझम वाढवण्याचा विचार आहे, इतकेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.