>> माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांचे मत
ऑस्ट्रेलियात १४ दिवस क्वॉरंटाइन सक्तीचे असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ऑस्ट्रेलियात ‘जंबो’ पथक पाठवावे लागणार आहे, असे निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी काल शुक्रवारी सांगितले. विलगीकरणाच्या नियमामुळे वेस्ट इंडीज व पाकिस्तान यांनी इंग्लंड दौर्यासाठी अधिक सदस्यांना पाठवले आहे. इंग्लंडमधील कोरोनासंबंधी शिष्टाचारामुळे पाकिस्तानचा संघ २९ सदस्यीय संघासह इंग्लंडमध्ये आहे तर वेस्ट इंडीजने २६ सदस्यीय संघ पाठवला होता.
‘संघ व्यवस्थापन व सीनियर खेळाडूंना या निमित्ताने संघाची दारे ठोठावणार्या युवा खेेळाडूंना चाचपण्याची संधी मिळेल, असे फेब्रुवारी महिन्यापर्यंत निवड समिती प्रमुख पदावर राहिलेल्या प्रसाद यांनी सांगितले. या प्रक्रियेमध्ये भविष्यात चमक दाखवू शकणार्या खेळाडूंची पारख करणे सोपे जाणार आहे, असे प्रसाद यांना वाटते.
वेस्ट इंडीज व पाकिस्तानने केल्याप्रमाणेच ‘जंबो’ संघातील खेळाडू क्वारंटाइन कालावधीत आपापसात सामना खेळून चांगल्यारितीने सरावही करू शकतात. या निमित्ताने पहिल्या पसंतीच्या खेळाडूंना वेगवेगळ्या शैलीच्या गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियन वातावरणात सामना करण्याची चांगली संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाज वेगवेगळ्या शैलीचे आहेत. त्यामुळे क्वारंटाइन कालावधीत भारताचे प्रमुख चार-पाच गोलंदाज नियमित खेळणार्या फलंदाजांव्यतिरिक्त इतरांनादेखील गोलंदाजी करून आपला सराव करू शकतात, असे प्रसाद यांनी सांगितले.
श्रेयस अय्यर सारखा फलंदाज आक्रमकही खेळू शकतो अन् चित्रविचित्र फटके देखील मारू शकतो. त्यामुळे नेटस्मध्ये किंवा सराव लढतीत त्याला गोलंदाजी करणे कसोटी संघातील इतर नियमित फलंदाजांना गोलंदाजी करण्यापेक्षा वेगळे असेल, असे प्रसाद यांना वाटते. नेटस्मध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्थानिक खेळाडू मिळणार नाहीत त्यामुळे संघात राखीव युवा वेगवान गोलंदाज असले तर बुमराह, शमी, इशांत व उमेश यांना थोडी उसंत मिळेल, असे प्रसाद म्हणाले. मोठा संघ निवडल्यास प्रत्येकाला दर्जेदार सराव मात्र मिळू शकणार नाही, असा ‘जंबो’ संघाचा एक तोटादेखील प्रसाद यांनी सांगितला.
चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांना आयपीएलमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात कसोटी खेळणे सोपे जाईल. इतरांना मात्र टी-ट्वेंटीमधून कसोटी क्रिकेटशी जुळवून घ्यावे लागणार आहे, असे प्रसाद शेवटी म्हणाले.