गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून 20 मे रोजी अटक करण्यात आलेल्या चार आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांनी भारतात हल्ल्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. त्यांनी आपण पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याचे सांगितले. अहमदाबादमध्ये त्यांच्यासाठी शस्त्रे ठेवण्यात आली होती.
शस्त्रे गोळा केल्यानंतर पाकिस्तानी हँडलर कुठे आणि कधी हल्ला करायचा हे सांगणार होते. या संशयितांच्या फोनमध्ये सापडलेल्या भौगोलिक निर्देशांकांच्या आधारे अहमदाबादमधील एका ठिकाणाहून तीन पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
हे चौघेही श्रीलंकन नागरिक असून ते भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या (आयएस) सांगण्यावरून भारतात आले होते.
मोहम्मद नुसरत, मोहम्मद नुफ्रान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद रझदीन अशी त्यांची नावे आहेत. हे चौघेही इंडिगो फ्लाइटने चेन्नईहून अहमदाबादला विमानाने आले होते.