भारतात ओमिक्रॉनचे ११ सबव्हेरियंट

0
10

>> २४ डिसेंबरपासून १२४ रुग्ण कोरोनाबाधित

>> विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग चाचणी

चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंटने हाहा:कार माजवला असून भारतातही खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या २४ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत भारतात परदेशातून आलेल्या प्रवाशांत १२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. तसेच ११ जणांना ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटची बाधल्याचे आढळले आहे.

जगातील कोरोनाचा धोका पाहून भारताने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विमानतळवर आतंरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय चीन, थायलंडसह सहा देशांतून येणार्‍या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. २४ डिसेंबरपासून आतापर्यंत विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे ११ सब व्हेरियंट आढळले आहेत. तर एकूण १२४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

अमेरिकेतून आलेले ४ जण बाधित
बुधवार दि. ४ रोजी पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंटच्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली. हे सर्वजण अमेरिकेतून आल्याचे आरोग्य विभागानं सांगितलं आहे. नुकतेच अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या सर्वांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट बीएफ ७ ची बाधा झाली आहे. दमार्यन, गेल्या गेल्या आठवड्यातही कोलकाता विमानतळावर कोविड-१९ चाचणीत एका परदेशी नागरिकासह दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

उत्तर प्रदेशमध्येही रुग्ण
अमेरिकेत शिकत असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका तरुणाला घरी परतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्या विद्यार्थ्याला घरीच विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.

डब्ल्यूएचओचा इशारा
डब्ल्यूएचओनेही नव्या वर्षात कोरोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. एक नवी लाट येऊ शकते, आता एक्सबीबी १.५ हा प्रकारही वेगाने पसरत आहे. त्यामुळे प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरूवात करावी. रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहू नका असा इशाराही डब्ल्यूएचने दिला आहे.

१२४ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना
भारतात या सर्व व्हेरियंटचे रुग्ण याआधीही आढळले आहेत. २४ डिसेंबर ते ३ जानेवारी यादरम्यान, १९ हजार २२७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात १२४ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या एक्सबीबी.१.५ व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले होते. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.