भारतातील ३५८ रुग्णांंपैकी ११४ जण ओमिक्रॉनमुक्त

0
12

ओमिक्रॉनबाबत काल शुक्रवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगभरातील १०८ देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनचे १ लाख ५१ हजार रुग्ण आढळले आहेत तर २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ३५८ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ११४ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे, असेही भूषण यांनी सांगितले. जगभरात कोविडचे रुग्ण वाढत असून जगभरात गुरूवार दि. २३ रोजी एकाच दिवशी ९.५४ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. ही जगासाठी करोनाची चौथी लाट मानता येईल असे भूषण यांनी सांगितले. भारतात गेल्या २४ आठवड्यांपासून दररोज सरासरी ७ हजार नवे करोना बाधित आढळत आहेत.

डेल्टापेक्षा ओमिक्रॉनचा फैलाव अधिक वेगाने होत आहे. त्यासाठी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत भारतातील केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि मिझोराम या राज्यांत सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात केरळ आणि मिझोराममधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. देशातील जवळपास २० जिल्ह्यांत रुग्णवाढ अधिक असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याची माहिती यावेळी भूषण यांनी दिली.
आरोग्य सचिव यांनी पुढे माहिती देताना, ८९ टक्के प्रौढ लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला असल्याचे सांगितले. तसेच पात्र लोकसंख्येपैकी ६१ टक्के लोकांना कोविड-१९ लशीचा दुसरा डोस मिळाला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात जमावबंदी
महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदीच्या दरम्यान सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आणण्यात येणार आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये आजपासून
रात्रीची संचारबंदी लागू

ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. नाताळपासून म्हणजे आज दि. २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. याशिवाय सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधने आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये कोरोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करावे लागणार आहे.